
सायकल राईडमधून जमीन वाचवाचा संदेश
शहापूर, ता. २६ (बातमीदार) : जमीन वाचवा आणि भुकेच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी कोलकाता येथील एका मुलाने सायकलवरून देशभर प्रवास सुरू केला आहे. त्याने शहापुरात आगमन केल्यानंतर इगतपुरीकडे प्रयाण केले. १ मे २०२२ रोजी साहिल झा या १७ वर्षीय मुलाने बोर्डाची १० वीची परीक्षा दिल्यानंतर या अनोख्या प्रवासाला सुरुवात केली. दोन वर्षे चालणाऱ्या या मोहिमेला सहा महिने झाले असून शनिवारी सायंकाळी शहापुरात साहिलचे आगमन झाले. येथील सरकारी विश्रामगृहात माजी आमदार पांडुरंग बरोरा व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचे स्वागत केले आणि या जनजागृती मोहिमेला शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत १० राज्यात १५० हून अधिक कॉलेज आणि हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी संपर्क झाला व आपल्या मोहिमेचा उद्देश त्याने समजावून सांगितला. याशिवाय लायन्स, रोटरी क्लब, विविध महापालिका, पोलिस यांच्या विविध समारंभांत या मोहिमेचे स्वागत झाल्याचे त्याने सांगितले.