
आनंद परांजपे यांच्यावर गुन्हे दाखल
उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : मुख्यमंत्री, बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मानहानीकारक शब्द उच्चारल्याप्रकरणी राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उल्हासनगरातील बाळासाहेबांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी केलेल्या तक्रारीवरून येथील मध्यवर्ती व उल्हासनगर अशा दोन पोलिस ठाण्यांत आनंद परांजपे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहरप्रमुख जयकुमार केनी यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात आणि विभागप्रमुख प्रमोद पांडे यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हे गुन्हे करण्यात आले आहेत. या वेळी युवासेनेचे कल्याण उपजिल्हा अधिकारी युवराज विजय पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच हिललाईन पोलिस ठाण्यात बाळासाहेबांच्या युवासेनेचे विभाग अधिकारी विनसेंट पटाळी यांनी तक्रार दिली आहे. त्यात आनंद परांजपे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या वेळी युवासेना कल्याण उपजिल्हा अधिकारी युवराज विजय पाटील, शाखाप्रमुख सुभाष कोळी, संदीप यादव, विकी गुंड, चंदन गोंड उपस्थित होते.