औद्योगिक गुंतवणूकदारांची पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औद्योगिक गुंतवणूकदारांची पाठ
औद्योगिक गुंतवणूकदारांची पाठ

औद्योगिक गुंतवणूकदारांची पाठ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
श्रीवर्धन, ता. २६ : उद्योग-व्यवसाय नसल्‍याने मध्य रायगडमधील तरुण बेरोजगारीच्या दरीत फेकले जात आहे. याचा गैरफायदा घेत काही राजकीय नेतेमंडळी तरुणांना आर्थिक विकासाची स्वप्ने दाखवत आहेत; दिघी पोर्टमुळे बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या; मात्र, प्रत्यक्षात स्‍थानिक तरुणांच्या पदरी निराशाच आली आहे. गतआर्थिक वर्षात श्रीवर्धन, म्हसळा, तळा या तालुक्यात एकाही मोठ्या उद्योगाने एक रुपयांचीही गुंतवणूक केलेली नाही. पायाभूत सुविधा नाहीत म्हणून उद्योग नाही, उद्योग नाही म्हणून पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा दुष्टचक्रात रायगडमधील हे तीन तालुके अडकले आहेत.

औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्‍या रायगडच्या आर्थिक विकासाचा आलेख गेल्‍या काही वर्षांत घसरलेला दिसतो. सध्या श्रीवर्धन तालुक्यात दिघी पोर्ट अस्तित्वात येत आहे; परंतु पोर्टचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पोर्टमुळे परिसरात उद्योग-व्यवसाय बहरतील, अशी स्‍थानिकांची धारणा होती, मात्र तसे काहीच झाले नाही. गतआर्थिक वर्षात जिल्ह्यात २०८ विदेशी गुंतवणुकीचे, तर इतरही लहानमोठे प्रकल्प प्रस्तावित झाले आहेत. यात २ हजार ८७६ कोटींची गुंतवणूक जिल्ह्यात करण्यात आली. तर ५१४ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत प्रकल्प प्रस्तावित झाले असून त्‍यात २६ हजार ७९५ कोटींची गुंतवणूक झाली आली. मात्र मध्य रायगडच्या तीन तालुक्यांमध्ये एक रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित नसल्याचे औद्योगिक महामंडळाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

दिघी पोर्टमुळे आशा पल्लवीत
- दिघी पोर्टमुळे स्‍थानिक बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कोणत्याही मोठ्या पोर्टला औद्योगिक मालवाहतुकीसाठी सहा ते आठ पदरी महामार्ग लागतात, परंतु दिघी पोर्टला जोडणारा दुपदरी महामार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही.

- सह्याद्री डोंगररांगांच्या पलिकडे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पोर्टची जोडणी हवी आहे. परंतु दिघी पोर्टला सह्याद्री पलिकडे पुणे अथवा साताऱ्याला जोडणारा एकही द्रुतगती महामार्ग अस्तित्वात नाही अथवा प्रस्तावितही नाही.

- औद्योगिक मागासलेपणामुळे इथल्या तरुणांचे दरवर्षी शहराकडे स्थलांतर सुरू आहे. दर्जेदार शाळा, उच्चशिक्षण संस्था, तज्‍ज्ञ डॉक्टर या सर्वांची इथे उणीव जाणवते. कोरोनाची लाट पुन्हा आली तर ग्रामीण जीवनमान टिकवण्यासाठी ग्रामीण रोजगारक्षमता उभारणे गरजेचे आहे.


श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील दिघी पोर्ट सारखे औद्योगिक क्षेत्र उभे राहत आहे. म्हसळा तालुक्यात दास ऑफशोअर सारखी फॅब्रिकेशन कंपनी उभी आहे. आयटीआयमध्ये उद्योगांना पूरक शैक्षणिक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची आमची मागणी आहे. श्रीवर्धन तालुक्यात पर्यावरण पूरक उद्योगधंद्यांसाठी आग्रही आहोत, त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत.
- आदिती तटकरे, आमदार, श्रीवर्धन मतदारसंघ

श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यामध्ये जमिनी शासनाने संपादित केल्या असून दिघी पोर्ट वगळता अन्य मोठे प्रकल्प वा उद्योग धंदे या भागात आलेले नाहीत. यामुळे तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. नोकरी, उद्योग-व्यवसाय नसल्याने ते शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष घालावे.
- अॅड. जयदीप दीपक तांबुटकर, सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा, दक्षिण रायगड


जिल्ह्यातील गुंतवणूक (२०२१-२२)
तालुके/ प्रकल्प / गुंतवणूक (कोटी)
उरण/०/२९६३
पनवेल/३७३/२७९९.६२
पेण/०/२१०३३
माणगाव/ ८/०

महाड/७२/०

एमआयडीचे प्रस्तावित प्रकल्प - ५१४
गुंतवणूक - २६ हजार ७९५ कोटी

विदेशी गुंतवणूक
प्रस्तावित प्रकल्प - २०८
थेट गुंतवणूक - २ हजार ८७६ रुपये
*
मध्य रायगडमध्ये अस्तित्वात असलेले उद्योग (लघु, सुक्ष्म, मध्यम)
तालुका/ उद्योग/ गुंतवणूक रुपयांत
तळा/२१६/२ कोटी ४४ लाख
श्रीवर्धन/१८५/३ कोटी ५३ लाख
म्हसळा/२९/२० लाख रु