
देशाच्या शांती आणि प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र या
वसई, ता. २६ (बातमीदार) : समाजातील आगळे वेळेवेगळे धार्मिक समूह, निरनिराळ्या राजकीय पक्षांचे नेते, विविध संस्कृतीतील मान्यवर अशा सगळ्या घटकांनी देशातील एकता आणि शांती वृद्धींगत करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी हे खूपच मोलाचे ठरेल, असे आवाहन वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांचे सर्व धर्मीयांना केले.
नाताळ सणानिमित्त सर्वधर्म मैत्री प्रार्थना मेळावा वसई येथील बिशप हाऊसमध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रार्थना मेळाव्यास वसईतील विविध धर्माचे नेते, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. या मेळाव्यात नंदाखाल गावातील युवावर्गने नाताळ गीते सादर केली. तर सिस्टर शितल व कुमारी फ्लाविया परेरा यांनी प्रार्थनेद्वारे कार्यक्रमाची सुरुवात केली. दीप प्रज्वलनानंतर जगात शांती नांदावी म्हणून प्रार्थना करत उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
मच्याडो म्हणाले की, नाताळ हा सण प्रेमळ कृती करून साजरा होतो. समाजामध्ये आपण एकमेकांच्या संपर्कात राहून जोमाने काम करूयात. एकत्र येत धार्मिक सण साजरे केल्यास समाजात सुरक्षित क्षेत्र तयार होईल. विचारांची देवाण घेवाण झाल्यामुळे समस्यांना तोंड देता येईल.
यावेळी आचार्य गुरुजी प्रल्हाद नागरहळी, कल्लन खान, शेख युसुफ डोहडवला, मनिंदर सिंह कोहली, प्रा. डॉ. सुरेश गोतपगार, भारती ताई (ब्रम्हकुमारी), खासदार राजेंद्र गावीत, माजी आमदार डॉमिनिक घोन्सालवीस, प्राचार्य डॉ. सोमनाथ विभूते तसेच अनेक राजकीय, सामाजिक व धार्मिक नेत्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फा. रिचर्ड डाबरे यांनी केले, तर संदीप राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
----------
आदिवासींच्या मानवी हक्कांचे काय ?
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे. आदिवासी बांधवांच्या शिक्षणाचे काय त्यांच्या मानवी हक्कांचे काय, असा सवाल उपस्थित होत असतो. राज्यकर्ते विधायक कार्य करतात त्यांनी अशिक्षित व रंजल्या गांजलेल्यांना बळकट करण्याची गरज आहे, असे मत यावेळी आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी मांडले.
----------
वसई : नाताळनिमित्त पार पडलेल्या सर्वधर्मीय प्रार्थना मेळाव्यात सर्व धर्मातील मान्यवर उपस्थित होते.