केळवे किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळवे किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी
केळवे किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी

केळवे किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी

sakal_logo
By

पालघर, ता. २६ (बातमीदार) : कोरोनामुळे गेली दोन वर्षे नाताळ व ३१ डिसेंबर पर्यटकांना साजरा करता आला नाही; मात्र यंदा राज्य शासनाने सर्व निर्बंध मागे घेतल्यानंतर शनिवारी रविवारी ख्रिसमस यामुळे केळवे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी झाली होती. वर्षाच्या शेवटी अनेक चाकरमान्यांच्या सुट्ट्या शिल्लक असल्यामुळे सर्व पर्यटक केळवे येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कुटुंबासोबत येत आहेत. त्यामुळे नववर्षापर्यंत केळवे परिसरातील सर्व रिसॉर्ट, हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत.

केळवे पर्यटन केंद्रावर सुंदर असा बीच, निसर्ग सौंदर्य, खाण्यापिण्याची रेलचेल चांगली असल्याने मुंबई परिसराबरोबरच नाशिक, पुणे व इतर राज्यांतील पर्यटक केळवे बीचवर पर्यटनासाठी येतात. येथे असलेली रिसॉर्ट निसर्ग सौंदर्याने नटलेली असून पर्यटकांना लागणाऱ्या सर्व बाबी पूर्ण करत असतात. त्यामुळे केळवे पर्यटनाकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील याची कल्पना असल्याने व्यावसायिकांनी सर्व तयारी करून ठेवली आहे. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर सेलिब्रेशनसाठी अनेकांनी वन डे नाईटची योजना आखली आहे.

--------------------
दीड दिवसासाठी दोन हजार दर
महागाई वाढल्यामुळे दीड दिवसासाठी रिसॉर्ट व हॉटेल्सचे प्रतिव्यक्ती दोन हजारपासून ते तीन हजारपर्यंत दर आहेत. या पर्यटकांना शाकाहारी व मांसाहारी जेवण व इतर लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता केली जाते. त्यामुळे पर्यटक केळवेकडे पुन्हा पुन्हा येत असतात. त्यातच नाशिक विभागातले पर्यटकही आता केळवे येथे येत आहेत. पर्यटकांकडून विविध प्रकारच्या माशांची मागणी जास्त केली जात आहे.

..........................
गेली दोन वर्षे करोनामुळे पर्यटन व्यवसाय बंद होता; मात्र या वर्षी पर्यटकांचा ओघ वाढला आहे. केळवे पर्यटन केंद्र मुंबईपासून अवघ्या दोन तासांवर असल्याने एक दिवसीय किंवा दोन दिवसांसाठी पर्यटक येत असतात. या वर्षी एक महिन्यापासूनच पर्यटकांनी बुकिंग केल्यामुळे परिसरातील रिसॉर्ट व हॉटेल्सची बुकिंग हाऊसफुल्ल झाली आहे.
- कुंदन पाटील, हॉटेल व्यावसायिक, केळवे