
स्वच्छता अभियान खारघरमध्ये बारगळले
खारघर, ता.२६ (बातमीदार): देशपातळीवर सुरू असलेल्या स्वच्छता सर्वेक्षणासाठी राज्यात विविध महापालिकांकडून उपक्रम केले जात आहेत. पनवेल महापालिकेने देखील या अभियानात सहभागी होताना पालिकेच्या खारघरमध्ये अनेक ठिकाणा स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कामगारांच्या टाकावू वस्तूंचा वापर करून साकारलेल्या कलाकृती साकारल्या आहेत. पण या कलाकृती दुर्लक्षित झाल्या असून अनेक ठिकाणी धूळ साचल्याने नागरिकांमधून पालिकेविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
खारघर परिसरात स्वच्छतेचे काम करताना पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जलवायू, शिल्प चौक, सेंट्रल पार्क सर्कल, हिरानंदानी पुलाखाली आणि रस्त्याचा दुभाजकात होर्डिंग्जसाठी वापरल्या जाणाऱ्या काठ्या, वापरात नसलेले टायर,प्लास्टिकच्या बाटल्या, दुचाकी, चारचाकी टायर, गाडीचे छप्पर, नारळाच्या फांद्या, वापरात नसलेले मोठे ड्रम अशा टाकाऊ वस्तूंपासून विविध कलाकृती साकारलेल्या आहेत. त्यात खारघर हिरानंदानी पुलाखाली दुकानातील टाकाऊ पुतळ्याला साडी नेसून हाती झाडू आणि स्वच्छता कर्मचारीचे गणवेश परिधान केलेले सफाई कामगार, शिल्प चौक येथे दुभाजकात साकारलेली प्रवासी बस, जलवायू समोरील आय लव्ह खारघरची प्रतिकृती रस्त्यांवरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. पण प्रचंड मेहनत करून साकारलेल्या या कलाकृतीकडे पालिकेनेच दुर्लक्ष केले असल्याने सध्या त्या धूळ खात पडलेल्या आहेत. त्यामुळे खारघरवासियांमध्ये या प्रकारामुळे नाराजी पसरली आहे.