बदलत्या ठाण्यावर वॉर रुमची नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलत्या ठाण्यावर वॉर रुमची नजर
बदलत्या ठाण्यावर वॉर रुमची नजर

बदलत्या ठाण्यावर वॉर रुमची नजर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानांतर्गत सहा महिन्यात रस्ते खड्डेमुक्त करून, शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे आव्हान पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्‍वीकारले आहे. त्या दृष्टीने शहरात जोरात कामेही सुरू आहेत. पण या महत्त्वाकांक्षी अभियानात कोणतीही उणीव राहता कामा नये यासाठी आता या बदलत्या ठाण्याच्या विकासकामांवर वॉर रुमची नजर राहणार आहे. लवकरच हे वॉर रुम तयार केले जाणार असून दैनंदिन कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र अशा चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी दिली आहे.
ठाणे शहरात खड्डेमुक्त रस्ते, शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता, शौचालयाची सफाई यासह विविध नागरी कामे ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानातंर्गत हाती घेण्यात आली आहे. या कामांसाठी दोन ते सहा महिन्यांचा मर्यादित कालावधी ठेवण्यात आला आहे. या कालावधीमध्ये ही सर्व कामे पूर्ण करुन नागरिकांना शहरात दृश्यस्वरुपात होणारा बदल घडवून आणणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे या महत्त्‍वाकांक्षी चारही कामांचा आढावा वॉर रुमच्या माध्‍यमातून घेतला जाणार आहे. या कामांची छोट्या बाबींमध्ये विभागणी केली जाणार असून, त्यांची कालमर्यादा निश्चित असल्याने दैनंदिन कामाची प्रगती पाहिली जाणार आहे. वॉर रुमच्या माध्यमातून कामांचा प्रगती अहवाल प्राप्त होईल.
----------------------------------------------------
चारही कामांसाठी अधिकारी नियुक्त
प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असतानाच एका बाजूला प्रकल्पाची गती, कामाचा दर्जा याची अद्ययावत माहिती उपलब्ध तर होईलच, त्याबरोबरच प्रकल्प अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्याबाबत कामाच्या धोरणात सुधारणा करणे शक्य होणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले. खड्डेमुक्त रस्ते, शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता, शौचालयाची सफाई या चारही कामांसाठी प्रत्येकी एक अधिकारी नियुक्त करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कामांचा दैनंदिन प्रगती अहवाल सादर केला जाईल. हा अहवाल वॉर रुमच्या माध्यमातून आयुक्तांना केव्हाही पाहणे सहज शक्य होणार आहे.