
बदलापूरकरांसाठी नवीन पादचारी पूल खुला
बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : बदलापूर शहरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कर्जत दिशेकडून नव्याने बांधण्यात आलेला पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला असला तरी, अद्याप अधिकृतरीत्या पूल वापरात येण्यास बदलापूरकरांना चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यात हा नवा पूल जुन्या पुलाला जोडल्याने पश्चिमेकडील नागरिक रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत.
बदलापूर शहरातून रोज हजारो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. शहराची लोकसंख्या पाहता रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यात मुख्य म्हणजे कर्जत दिशेला बदलापूर फलाट क्रमांक एक व दोनवरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे; मात्र या भागातून पादचारी पूल नसल्याने व जो पूल एमएमआरडीएकडून बांधण्यात आला तो पूल रेल्वेस्थानकाशी जोडलेला नसल्याने याचा प्रवाशांना काहीच उपयोग नव्हता. त्यामुळे प्रवासी रुळावरून ये-जा करत होते. आता होम प्लॅटफॉर्मसह या ठिकाणी नवीन पादचारी पूल बांधण्यात आला आहे.
प्रवाशांची नाराजी
रोजची वाढणारी गर्दी, त्यात होम प्लॅटफॉर्मचे सुरू असलेले काम यामुळे गाडी फलाटावर लागताच होणारी गर्दी लक्षात घेता नवीन बांधण्यात आलेला पूल प्रवाशांसाठी सध्या तात्पुरता खुला करण्यात आला आहे. अधिकृतरीत्या हा पूल वापरात आणण्यास अजून चार महिन्यांचा काळ लागणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे; मात्र या पुलाचा वापर करताना पश्चिमेकडून प्रवास करणारे प्रवासी या पुलावर नाराजी व्यक्त करत आहेत.
----------------------------------
प्रवाशांची नाराजी लक्षात घेऊन लवकरच होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाल्यावर नवा पूल अधिकृतरीत्या वापरात येईल; मात्र या कामासाठी अजून चार महिन्यांचा काळ लागणार असून, प्रवाशांनी सहकार्य करावे. जुना पूल जीर्ण झाला आहे. तसेच पश्चिमेकडे उतरण्यास जुन्या पुलाचे जिने वापरता येणार असून, त्याची लवकरच डागडुजी करण्यात येईल.
- एस. बी. सिंग, स्टेशन मास्तर, बदलापूर रेल्वे स्थानक