
उपोषणाचा दणका बसताच स्वच्छतागृहाला दरवाजे
अंबरनाथ, ता. २६ (बातमीदार) : स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी मनसेने उपोषणाचा दणका देताच प्रशासनाच्या पातळीवर सूत्रे हालली आणि दुरवस्था झालेल्या स्वच्छतागृहाची दुरुस्तीला सुरुवात झाली. स्वच्छतागृहाचे तुटलेले दरवाजेही बसवण्यात आले. सोमवारी सकाळपासून सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले.
पूर्वेकडील ताडवाडी भागातील नादुरुस्त स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी सोमवारी स्वच्छतागृहासमोरच उपोषण सुरू केले होते. शहर सरचिटणीस अविनाश सुरसे आदी यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता सर्वेक्षणाच्या वेळी आलेल्या अधिकाऱ्यांना रोल मॉडेल म्हणून दाखवल्या जाणाऱ्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. नगरपालिकेशी याबाबत संपर्क साधूनही स्वच्छतागृहाची डागडुजी केली नसल्याच्या कारणावरून मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, माजी नगरसेवक बागुल यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर रविवारी पालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छतागृहात नवे दरवाजे बसवण्यात आले आहेत. बाजूला पडलेला मातीचा ढिगारा हटवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. खिडक्यांची तुटलेली काचेची तावदाने देखील बसवण्याचे काम केले जाणार आहे, मनसेने उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने कार्यवाही केल्याचे बागुल यांनी सांगितले.
किल्ली स्थानिकांकडे देण्याचा निर्णय
स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नवीन दरवाजे बसवण्यात आले असून नळांची सोय केली जाणार आहे. दुरुस्तीनंतर पुन्हा स्वच्छतागृहाची नासधूस होऊ नये, यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून लोखंडी गेट बसवून त्याची किल्ली स्थानिकांकडे देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सुनील जाधव यांनी सांगितले. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीनंतर आणि लेखी निवेदनांतर सायंकाळी स्वप्नील बागुल यांनी उपोषण मागे घेतले.