सायरस मिस्त्री अपघाताच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायरस मिस्त्री अपघाताच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह
सायरस मिस्त्री अपघाताच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह

सायरस मिस्त्री अपघाताच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह

sakal_logo
By

पालघर, ता. २६ (बातमीदार) : उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींवर अजामीनपात्र कलम दाखल करावे व कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल दाखल करावा, अशी मागणी पालघर येथील संदेश शिवाजी जेधे यांनी केली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ४ सप्टेंबर २०२२ रोजी उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासह जहाँगीर पंडोले यांचा अपघाती मृत्यू झाला होता. अनहिता पंडोले आणि त्यांचे पती डेरियस पंडोले जखमी झाले होते. अपघातावेळी मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ अनहिता या कार चालवत होत्या. दोन महिन्यांनंतर नोव्हेंबरमध्ये कासा पोलिसांनी अनहिता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता या अपघातप्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत योग्य तपास केला नसल्याचा आरोप दाखल याचिकेत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींवर अजामीनपात्र कलम दाखल करावे व कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील सादिक अली यांनी याचिकेत केली आहे.

काय आहे कलम ३०४?
एखाद्या व्यक्तीचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला, तर अशा स्थितीत संबंधित व्यक्तीवर कलम ३०४ (अ) अंतर्गत कारवाई होऊ शकते. यात आरोपीला दोन वर्षांची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्हीही होऊ शकतात.