
बदलापुरात अटलसंध्या कार्यक्रम उत्साहात
बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कपिल फाऊंडेशनच्या वतीने शहरात आयोजित अटलसंध्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध बॉलीवूड गायक कैलास खेर यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने चार चाँद लावले; तर सुप्रसिद्ध मराठी तारका व नृत्यांगना अमृता खानविलकर हिच्या लावणीने रसिकांना भारावून टाकले.
२५ डिसेंबर म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस. बदलापूर शहरातदेखील दरवर्षी या दिवशी अटलसंध्या हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या वेळी बॉलीवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकार आपली कला सादर करतात. कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा कार्यक्रम घेता आला नाही; मात्र यंदा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून बदलापूर पूर्व आदर्श महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात अटलसंध्या हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी मुख्य आकर्षण म्हणजे बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने कार्यक्रमाला चार चाँद लावले. ‘तेरी दिवानी’ व ‘सैंया’ या गाजलेल्या गाण्यांसह इतर गाण्यांची मैफिल जमवत तरुणाईला अक्षरशः वेड लावले. मराठी तारका मृण्मयी देशपांडे हिनेदेखील या कार्यक्रमात आपली कला सादर केली, तसेच मराठी हास्यजत्रेचे विनोदी कलाकार यांनी उपस्थित राहून रसिकांना हसवले.