
टोकवडे येथे आदिवासीना मोफत दाखले वाटप
मुरबाड, ता. २७ (बातमीदार) : तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांसाठी टोकावडे येथे तहसीलदार कार्यालयामार्फत मोफत दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात आदिवासी समाज व अन्य नागरिकांना उत्पन्न दाखले, त्रैवार्षिक दाखले, अधिवास, संजय गांधी निराधार योजना, जातीचा दाखला, रेशनकार्ड दुय्यम दुरुस्ती इत्यादी दाखले मोठ्या प्रमाणावर देण्यात आले.
टोकावडे येथील सामाजिक कार्यकर्ते महेश भांगे व श्रमजीवी संघटना मुरबाड यांच्या सहकार्याने मुरबाड तहसीलदार कार्यालयामार्फत नायब तहसीलदार मोडक, पुरवठा अधिकारी दाभाडे यांनी विविध प्रकारचे १८० दाखले, ५० ते ६० लोकांची रेशनकार्ड दुरुस्ती, निराधार योजना, अधिवास दाखले वाटप केले. त्याबद्दल परिसरातील लोकांनी त्यांचे आभार मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ऋतिक म्हारसे, सूरज घुडे आदींनी परिश्रम घेतले. कुणबी समाज संघटनेचे प्रकाश पवार, माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत, उपसभापती सीमा घरत, टोकावडेचे माजी सरपंच बंधू पवार, काळूराम घोलप, नरेश उंबरे आदींनी शिबिरास भेट दिली.