कल्‍याण-डोंबिवलीकराच्‍या जीवाशी खेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्‍याण-डोंबिवलीकराच्‍या जीवाशी खेळ
कल्‍याण-डोंबिवलीकराच्‍या जीवाशी खेळ

कल्‍याण-डोंबिवलीकराच्‍या जीवाशी खेळ

sakal_logo
By

कल्याण, ता. २७ (बातमीदार) : एखाद्या शहरात मोठे मोठे प्रकल्प आले की शहराचा विकास झाला असे समजले जाते; मात्र शहरात सध्या सुरू असलेल्‍या विकासकामांमुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे पालिकेच्या एका अहवालावरून उघड झाले आहे. शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमुळे शहरात होणारी वाहतूककोंडी, हॉर्नचे कर्कश्श आवाज, वाहनांमधून निघणारा धूर यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. परिणामी, कल्‍याण-डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कल्याणमध्ये वाहतूककोंडी हा प्रश्न नित्‍याचाच झाला असून त्यावर उपाय म्हणून स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशनबाहेर विविध प्रकल्प उभे राहत आहेत. राज्याच्‍या रस्ते विकास महामंडळामार्फत कल्याण-शिळफाटा सिमेंट रस्त्याचे काम, त्यामुळे शहरातील विविध भागांत दिवसभर कोंडी होत आहे. वाहनांमधून निघणारा धूर आणि हॉर्नचे कर्कश्श आवाज यामुळे शहरातील ध्वनिप्रदूषण वाढल्याचे समोर आले असून विविध प्रकल्प उभे राहिल्यावर ही समस्या दूर होईल, असा दावा सरकारी यंत्रणा करत आहे.

आरोग्यावर परिणाम...
कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांमध्ये मानसिक परिणाम, ऐकायला कमी येणे, बहिरेपणा, वाढलेला रक्तदाब, चिडचिडेपणा, थकवा, हृदयाची धडधड वाढणे आदी त्रास वाढल्याची माहिती तज्‍ज्ञांनी दिली.
-------------------------
पालिकेमार्फत उपाययोजना सुरू
ध्वनिप्रदूषणाबाबत दरवर्षी तपासणी करून अहवाल प्रसिद्ध केला जातो. शहरात ध्वनिप्रदूषण वाढत असून ते कमी करण्यासाठी बोर्ड लावणे तसेच यंत्रणा बसवणे आदी स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत विविध उपाययोजना पालिकेमार्फत सुरू असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या विविध विभागामार्फत उपाययोजना करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिका शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली.
------------------------------------------
सरकारी यंत्रणेमुळे समस्‍या
दोन्ही शहरांत विविध समस्यांचा महापूर असून, पालिका आणि अन्य सरकारी अधिकारी वर्ग आणि विभागामध्ये समन्‍वय नसल्याने सरकारी आदेशाची अंमलबजावणी होत नसून, सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेमुळे शहरात विविध समस्या उभ्या राहत आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे.