
नव्या विचारांमुळे आगरी भाषा राजदरबारी
नवी मुंबई, ता.२७ (वार्ताहर): आगरी साहित्य संमेलनाची चळवळ २२ वर्षांपासून अविरतपणे सुरु आहे. नवे विचार, नवे साहित्यिक या भाषेत निर्माण झाल्याने आगरी बोलीभाषेला राजदरबारी ओळख निर्माण झाली आहे. ही बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन आगरी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका दमयंती भोईर यांनी केले आहे. कोपरखैरणेतील आगरी साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या.
नवी मुंबई शहरात नव नवीन प्रकल्प आणि उद्योगधंदे आले; येथील आगरी पारंपरिक व्यवसाय नष्ट झाले. जमिनी गेल्या त्याचा पैसा संपला. आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष व्हायला हवा होता, तो झाला नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत आज आगरी समाज शिकतोय. जागतिक स्पर्धेत विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करतोय. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातही यापुढे घुसळण होणे गरजेचे असल्याचे साहित्यिका दमयंती भोईर यांनी सांगितले. यावेळी संमेलनाच्या पहिल्या सत्रात पारसिक बँकेचे संस्थापक कै.गोपीनाथ पाटील आदर्श व्यक्तिमत्वाचा ठसा या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादाच्या अध्यक्षपदी माजी खासदार जगन्नाथ पाटील उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पाटील यांनी संमेलनाध्यक्षा दमयंती भोईर यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. दुपारच्या सत्रात मिनाक्षी तांडेल यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्यातील आगरी महिलांच्या साहित्याचा ठसा या विषयांवर महिलांनी भाषणे केली.
----------------------------
भूषण पुरस्काराने गौरव
अॅड.पी.सी.पाटील (शिक्षण महर्षी), ह.भ.प.सुनील महाराज रानकर (वारकरी संप्रदाय), ह.भ.प. सोपान महाराज म्हात्रे, पुंडलिक म्हात्रे (आगरी भूषण), प्रकाश तांडेल (क्रीडा भूषण), दीपक पाटील (आगरी समाज भूषण ), देवराम मरोड आणि हरिश्चंद लंगडे (वारकरी संप्रदाय, इगतपुरी-नाशिक), मीनल माळी, सुविधा पाटील तसेच जनार्धन पाटील यांना आगरी भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.