
वसई-विरारमध्ये होणार पक्षी गणना
विरार, ता. २७ (बातमीदार) : वसई विरार शहर महापालिकेच्या वतीने शहरात बीएनएचएस आणि नेस्ट एनजीओ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी गणनेचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. महानगरपालिका आणि आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या पाणथळ जागा, समुद्र किनारे, तलाव, धरणे इत्यादी सुमारे ३० ठिकाणी पाणपक्षांची गणना करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना पक्ष्यांची गणना कशी करावयाची यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सर्वप्रथम नोंदणी करणाऱ्या पहिल्या ३०० नागरिकांनाच ही सुवर्णसंधी देण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रशिक्षण घेतलेल्या नागरिकांना २६ जानेवारीला प्रशस्तीपत्र आणि पक्षीजगत हे पुस्तक भेट दिले जाणार आहे. हे ऑनलाईन प्रशिक्षण २८ डिसेंबरला होणार आहे. तर पक्षीगणना कार्यक्रम ७, १४ आणि २१ जानेवारीला सकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे, असे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले.