चोरट्यांचा सुळसुळाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरट्यांचा सुळसुळाट
चोरट्यांचा सुळसुळाट

चोरट्यांचा सुळसुळाट

sakal_logo
By

वसई, ता. २७ ( बातमीदार) : वसई-विरार मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. आयुक्तालय क्षेत्रात गेल्या वर्षभरात ५३९ घरफोडीच्या घटना घडल्या असून, सरासरी पाहता महिन्याला ४५ घरफोडी इतके प्रमाण आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५८ अधिक घरफोड्या झाल्या आहेत. अनेकदा घराबाहेर गेल्यावर चोरटे घराचे कुलूप किंवा अन्य मार्गाने प्रवेश करतात आणि चोरी करून पसार होतात. त्यामुळे नागरिकांनीदेखील घराबाहेर जाताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
वसई-विरार मिरा-भाईंदर शहराची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. वाढते नागरिकीकरण पाहता येथे गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. पोलिस आयुक्तालय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, वालीव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ९९ घरफोडीच्या घटनांची नोंद झाली आहे. यातील ५४ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर विरार येथे ९५ पैकी ४७ गुन्हे उघड झाले आहेत. याचबरोबर पेल्हार पोलिसांत ५३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आकडेवारीवरून वसई विरार शहरात घरफोडीचे प्रमाण वाढले असल्याचे स्पष्ट होत आहे.
नालासोपारा, वालीव भागात दाटीवाटीच्या वस्ती अधिक आहे. घर बंद किंवा कामानिमित्त आजूबाजूला गेल्यास चोरटे घरफोडी करून मौल्यवान ऐवज, रोकड लुटून पोबारा करतात. अनेकदा नागरिक सणासुदीला किंवा फिरण्यासाठी बाहेर जाताना दागिने, पैसे घरात ठेवून कुलूप लावून कुटुंबासह निघून जातात. अशात घर बंद असल्याची संधी साधत चोरटे हा ऐवज लंपास करतात. घरातील व्यक्ती परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात येते.
पोलिसांत तक्रार दाखल झाल्यावर पोलिस सीसीटीव्ही, पुराव्याच्या आधारे चोरट्यांचा मागोवा घेतात. मात्र अनेकदा घरफोडी करणारे बाहेर गावी पळून जात असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी अधिक वेळ लागतो. एकीकडे पोलिसांकडून वारंवार जनजागृती केली जात असताना मात्र नागरिक गाफील राहत असल्याने चोरांना संधी मिळत आहे, गेल्या वर्षीपेक्षा यंदा चोऱ्या वाढल्या असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे.
--------------------
२०२२
दाखल - ५३९
उघड २९२
-------------
२०२१
दाखल - ४८१
उघड - २७९
---------------
पोलिसांचे आवाहन
गृहसंकुलात सुरक्षारक्षक नेमावा
परिसरात सीसीटीव्ही नसतील ते बसवून घ्यावेत
अनोळखी व्यक्तींची चौकशी करावी
संशयित वाटल्यास पोलिसांना संपर्क साधावा
बाहेर जातांना मौल्यवान वस्तू बँकेत किंवा लॉकरमध्ये ठेवावेत
----------------
मिरा रोड, उत्तनमध्ये सर्वाधिक कमी प्रमाण
मिरा रोड, उत्तन याठिकाणी प्रत्येकी ७ घरफोडी तर अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी १२ घरफोडीचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
-----------------
नागरिकांनी घराबाहेर पडताना दागिने, पैशांची काळजी घ्यावी. तसेच जर कोणी संशयित आढळला तर नजीकच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी. गृहसंकुलात सुरक्षा रक्षक नेमताना त्याची पूर्ण माहिती घ्यावी तसेच सीसीटीव्हीदेखील परिसरात लावावेत.
- बलराम पालकर, जनसंपर्क अधिकारी, पोलिस आयुक्तालय