
कर्जतच्या राजकारणात समसमान तुल्यबळ
कर्जत, ता. २७ (बातमीदार)ः तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पाहता, सर्वच राजकीय पक्षांना समसमान यश मिळाले. खरे तर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे या कर्जत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांना या सात ग्रामपंचायतीत अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत अधिक यश मिळणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. याउलट ठाकरे गट आणि राष्ट्रवादी तथा महाविकास आघाडीला सात ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीवर यश मिळविता आले आहे, तर शिंदे गटाला अवघ्या दोन ग्रामपंचातीवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे पुढील जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीची विचार करिता आमदारांना शिंदे गटाचे वर्चस्व मिळविण्याकरिता अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे हे निश्चित.
राज्यात सत्ता बदल होऊन भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आले आहे. त्यामुळे साहजिकच सत्ताधारी आमदारांचे महत्त्व वाढणार, असे अपेक्षित होते. कर्जत मतदारसंघात शिंदे गटाचा आमदार असूनही बाळासाहेबांची शिवसेना एकाकी पडली आहे. भाजपकडूनही स्थानिक पातळीवर शिंदे गटाला हवी तशी साथ मिळाली नसल्याचे ग्रामपंचायतीच्या निकालावरून दिसून आले.
शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना आगामी जिल्हा परिषद, नगरपालिकेत अपेक्षित यश मिळविता आले नाही तर आगामी विधानसभा निवडणूक जिंकणे फारच कठीण जाईल. याउलट राष्टवादी आणि उद्धव ठाकरे गटाला सद्य स्थिती पाहता आगामी विधानसभा लढवणे सोपे होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
माथेरान नगरपरिषदेतही रस्सीखेच
लवकरच माथेरान नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. पाच वर्षांपासून नगरपरिषदेवर शिवसेनेची एक हाती सत्ता होती. मात्र तेथेही आता शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडल्याने आमदारांना येथे शिंदे गटाचे वर्चस्व राखायचे असल्यास तथा माथेरानची सत्ता काबीज करायची असल्यास मोठी कसरत करावी लागणार आहे.