मधमाशांवर आस्मानी संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मधमाशांवर आस्मानी संकट
मधमाशांवर आस्मानी संकट

मधमाशांवर आस्मानी संकट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २६ : परागी भवनातून शेती उत्पन्न ३० टक्क्यापर्यंत वाढविण्याचे काम मधमाशा करतात, या कामातून मधासारखा अन्नाचा प्रमुख स्रोत निर्माण करतात. अन्नसाखळीत प्रमुख स्थान असलेल्या मधमाशांचे अस्तित्व गेल्‍या काही वर्षांत धोक्यात आले आहे.
जंगलांचे कमी होणारे प्रमाण, शेतीपिकावर होणारी रासायनिक फवारणी आणि चक्रीवादळांनी मधमाशांवरील संकट तीव्र स्वरूपात जाणवत आहे. याचे परिणाम नैसर्गिक अधिवासात तयार झालेली मधाची विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या उपजीविकेवर होत आहे.
कोकणात जंगलपट्ट्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे मध संकलन करणे, हा प्रमुख व्यवसाय आहे. आदिवासी बांधवांच्या शेकडो पिढ्या मध संकलनावरच उपजीविका करीत होत्‍या. सततच्या जंगल तोडीमुळे अलीकडे हे प्रमाण खूपच कमी झालेले असल्याने हा व्यवसाय संकटात आलेला आहे. राहिलेली कसर निसर्ग चक्रीवादळाने भरून काढली. निसर्ग चक्रीवादळात जंगलातील उंचउंच झाडे देखील नष्ट झाली होती, त्यामध्ये मधमाशांचे घरटे देखील वाऱ्याबरोबर नष्ट झाले, लहान जीव असलेले मधमाशा देखील भरकटून गेल्या. निसर्ग चक्रीवादळातून ज्या मधमाशा वाचल्या होत्या त्या मधमाशांच्या संख्या दुसऱ्या वर्षी आलेल्या तौक्ते चक्रीवादळात कमी झाली. आधीच रासायनिक फवारणी, मोबाईल लहरींमुळे मधमाशांची संख्या कमी होत होती. त्यात चक्रीवादळाने भर पडली असून याचे दुष्परिणाम आता गंभीर स्वरूपात जाणवू लागले आहेत. जंगलभागात दहा ते पंधरा वर्षापूर्वी जितका मध मिळत असे त्याच्या २० टक्के देखील मध शोधून सापडत नसल्याचे या आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे.


रंगबेरंगी फुलांचे आकर्षण
कर्नाळा, फणसाड, म्हसळा येथील हरितपट्ट्यात विविध प्रकारच्या मधमाशा अस्तित्व मोठ्या प्रमाणात होते, ते खूपच कमी झाले आहे. मधमाश्या जिथे त्यांच्या अन्नाचा स्त्रोत भक्कम आहे अशाच ठिकाणी पोळ बनवतात, तयार करतात. त्याचे अन्न म्हणजे मकरंद किंवा परागकण. त्यासाठी त्या परिसरात फुलांचे प्रमाण जास्त असणे आवश्यक असते. त्यातही विविध प्रकारचे, रंगबेरंगी फुले असलेला परिसर प्रामुख्याने मधमाशा निवडतात. नैसर्गिक अधिवासात अशा फुलांचे प्रमाण कमी झाले.

औषध फवारणी ठरतेय घातक
एकाच हंगामात पावसाळ्यात पीक घेण्याचे प्रमाण रायगड जिल्ह्यात जास्त आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मधमाशांना पुरेशा प्रमाणात अन्न मिळत नाही. याचाही प्रमाण मधमाशांच्या संख्येवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यातच कमी वेळात जास्त रिझल्ट देणाऱ्या कीटकनाशक फवारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
***
मोबाईल लहरींचा परिणाम
मधमाशा अन्नाच्या शोधात पाच ते सहा किलोमीटरचा परिसरात भटकत असतात. परत येताना एका विशिष्ट ध्वनीचा माघ घेत येत असतात. अलिकडे मोबाईलचा वापर वाढत चाललेला असल्याने मोबाईल लहरींचा अडथळा या मधमाशांच्या परतीच्या प्रवासात येत आहे. त्यामुळे मधमाशा भरकटून जातात.
***
मधमाशांचे प्रकार
एपीस मेलीफेरा : या प्रकारच्या मधमाशीला इटालियन मधमाशी म्हणून ओळखले जाते. या मधमाशाची लांब ८ ते १३ मिमी पर्यंत असते. या मधमाशा कृत्रिम प्रकारे करण्यात येणाऱ्या मधमाशांच्या पेठांत पाळल्या जातात. अलिकडे कृत्रिम पेठांमध्ये मधमाशा पाळण्याचे प्रमाण वाढत असले तरी, ते काही ठराविक क्षेत्रापुरते मर्यादित आहे.

एपिस डॉरसॅटा : स्थानिक भाषेमध्ये आगीमाशी किंवा आगी मधमाशी या नावाने ओळखले जाते. या माशाच्या पोळ्याला ‘आगी मोहोळ’ म्हणतात. कोकणात जंगल भागात या मधमाशांचे प्रमाण विपुल होते. मोठमोठ्या झाडांवर पोळे दिसायचे. ही मधमाशी सर्वात मोठी असून उंची १८ ते २१ मिमी आसते. याच मधमाशांवर पर्यावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे.

एपिस फ्लोरिया : हिला फुलेरी मधमाशी असेही म्हणतात. आकाराने सर्वात लहान असून तिची उंची ८ ते १३ मिमी‌ असते. या मधमाशा पोटमाळा, बाल्‍कनी असे कुठेही पोळे बांधतात. तर काही माशा उंच झाडांवर पाहायला मिळतात.
---

एपिस सेराना इंडिका : स्थानिक भाषेत सातेरी मधमाशी म्हणून ओळखली जाते. आकारमानाने मध्यम त्यांची उंची १० ते १६ मिमी‌ असते. सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील डोंगरकपारीत या मधमाशांचे पोळे दिसून येतात. यांची टक्केवारी अत्‍यल्‍प असून अन्नाअभावी त्‍यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.


मधमाशा कमी होण्याची प्रमुख कारणे
अन्नाचा अभाव
पाण्याचा स्त्रोत अन्नाएवढंच महत्त्वाचा आहे. म्हणूनच मुबलक पाणी साठा असलेल्या ठिकाणीच मधमाश्या आपले पोळं बनवतात. आणि पाणीसाठा कमी झाला किंवा पोळ्यापासून पाणीसाठा अंतर वाढत गेल्यास लगेच स्थलांतर करतात.


प्रतिस्पर्धी माशांचे हल्ले
प्रतिस्पर्धा टाळण्यासाठी ज्याप्रमाणे वन्य प्राणी आपला परिसर अधोरेखित करत असतात त्याचप्रमाणे मधमाशाही प्रतिस्पर्धा टाळण्यासाठी एकाच परिसरात पोळ बनवत नाहीत. मात्र बरेचदा आकाराने मोठ्या, हिंस्र मधमाश्या, आग्यामाश्या, आकाराने लहान मधमाश्यांना हाकलून लावतात, त्यामुळे सुद्धा त्या पलायन करतात. एकाच पोळ्यात जास्त गर्दी झाल्यास मधमाशा वेगळं पोळं बनवतात

आग, वणव्यामुळे परिणाम
जंगलात आग लागते किंवा समाजकंटकांकडून आगी लावल्‍या जात असल्‍याने मधमाशा भाजण्याचे/जळण्याचे प्रसंग घडतात किंवा दूरवर लागलेल्या आगीचे धुरांचे लोट मधमाशांना बेचैन करतात व नाइलाजाने त्यांना स्‍थलांतर करावे लागते.

मधमाशांचे प्रमाण कमी होण्यास विविध कारणे आहेत. या माशा शेतकऱ्यांच्या खूपच फायद्याच्या आहेत, त्‍यामुळे औषध फवारणी करताना सायंकाळची वेळ निवडावी. या वेळेत अन्न जमा करण्याचे काम संपलेले असते. मोबाईल तर खूपच घातक ठरत आहे. जंगलांचे कमी होणारे प्रमाण, वणवे आदींमुळे मधमाशा संकटात येत आहेत. यासाठी आतापासून धोरण स्वीकारणे आवश्यक आहे.
- महादेव जाधव, महाबळेश्वर मधुमक्षिका केंद्र

मधमाशांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे, यास चक्रीवादळ, वणवे यासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि बदलते वातावरण तितकेच कारणीभूत आहे. मधमाशांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप घातक आहे. अलिकडे मधमाशा पिंजऱ्यात पाळून व्यावसायिक पद्धतीने मधाचे संकलन केले जात असले तरी नैसर्गिक अधिवासात मधमाशा कमी होत आहेत.
- तुषार केळकर, पर्यावरण प्रेमी, उद्धर-पाली

वातावरण बदलाचा गंभीर परिणाम मधमाशांवर होत आहे. या मधमाशांचे मानवी अन्नप्रक्रियेमध्ये मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. यासाठी आग न लावता मध काढणे, मधमाशा पळून जाण्यासाठी औषधाची फवारणी टाळणे गरजेचे आहे. जंगलामध्ये मध काढण्याचे काम करणाऱ्यांनी मधमाशांना त्रास किंवा मधमाशांची संख्या कमी होणार नाही यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
- आशिष ठाकरे, उप वनसंरक्षक, अलिबाग वनविभाग