पनवेलकरांचे आरोग्य पालिकेमुळे पणाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलकरांचे आरोग्य पालिकेमुळे पणाला
पनवेलकरांचे आरोग्य पालिकेमुळे पणाला

पनवेलकरांचे आरोग्य पालिकेमुळे पणाला

sakal_logo
By

कामोठे, ता.२७ (बातमीदार): जीवनशैलीतील बदल, मानसिक ताणतणावामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवत आहेत. अशातच खासगी रुग्णालयातील महागडे उपचार आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे पनवेलकरांसाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. पण कुचकामी धोरणांमुळे त्यात अपयश आले असून नागरिकांचे ‘आरोग्य’मात्र पणाला लागल्याचा प्रत्यय येत आहे.
पाच वर्षांपूर्वी नव्याने स्थापन झालेली ‘ड’ वर्गातील पनवेल महापालिकेचे वार्षिक बजेट सुमारे १५०० कोटींचे आहे. यात शहरातील रस्ते, नाले, गटारांचे बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, तलावांचे, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, वाहन खरेदी, नोकरदार वर्गाचे पगार यासाठी महापालिका सर्वाधिक पैसे खर्च करत आहे. पण नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे, सार्वजनिक उपक्रम राबवण्यासाठी पालिका फोल ठरली असल्याची नागरिकांची ओरड आहे. नागरी आरोग्य सेवेकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. बजेटमध्ये आरोग्य सेवेसाठी निव्वळ ४ टक्के निधीची तरतूद केली आहे. पालिकेचे पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे विभागात एकूण ६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित आहेत. या केंद्रावर प्राथमिक उपचार, लसीकरण, गरोदर मातांवर उपचार केले जातात. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवणे, वैद्यकीय उपचारासाठी अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे.
---------------------------
महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून अद्ययावत दवाखाना बांधला पाहिजे. माता बाल संगोपन केंद्र, प्रसूती गृह सुरु करण्याची नितांत गरज आहे. यासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करावी.
-डॉ. अरुणकुमार भगत, माजी नगरसेवक
----------------------------------------
महापालिका नागरिकांच्या आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष करत आहे. रस्ते,गटारे,पदाधिकाऱ्यांचे आलिशान बंगले बांधण्यावर वारेमाप पैशाची उधळपट्टी करत आहे. ठेकेदार पोसत आहे. सार्वजनिक रुग्णालय,परिवहन सेवा सुरु करण्याची नागरिकांची मागणी आहे.
-सुधा जाधव, गृहिणी, नवीन पनवेल
---------------------------------------
१०० खाटांचे रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे, भाडेतत्वावर जागेत आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. तसेच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न आहे.
-डॉ. रेहाना मुजावर, प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी, पनवेल महापालिका