खर्डी ग्रामीण रुग्णालयाचे लवकरच होणार उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खर्डी ग्रामीण रुग्णालयाचे लवकरच होणार उद्‌घाटन
खर्डी ग्रामीण रुग्णालयाचे लवकरच होणार उद्‌घाटन

खर्डी ग्रामीण रुग्णालयाचे लवकरच होणार उद्‌घाटन

sakal_logo
By

खर्डी, ता. २७ (बातमीदार) : खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून अंतर्गत रंगरंगोटी, व्यवस्थापन ही कामे सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीत रुग्णांना व कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देताना अडचणी येऊ नये व इमारतीत काही कमतरता आहे का, हे पाहण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी खर्डी येथे भेट देऊन नवीन इमारतीची पाहणी केली. इमारतीतील व्यवस्थापनाबाबत स्थानिक कर्मचाऱ्यांना सूचना देऊन रुग्णालयासाठी सर्व अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी खर्डीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधव, इंजिनिअर प्रदीप पाटील, ठेकेदार यांच्यासह कर्मचारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

खर्डी ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत मंजूर करण्यासाठी स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून ११ कोटीचा निधी राष्ट्रीय आरोग्य विभागाकडून उपलब्ध केला होता. इमारतीचे काम २०२१ रोजी सुरू करण्यात आले असून, ते आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा उद्‌घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. स्वतःची इमारत नसल्याने येथील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवता येत नसल्याचे कारण आरोग्य विभागाचे अधिकारी देत होते. यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने येथे नवीन इमारत बांधण्यासाठी पाठपुरावा केला.
---------------------------------
३० खाटांच्या रुग्णालयाला २७ कर्मचारी मंजूर
नवीन इमारत एक मजली असून यात दंत चिकित्सा, प्रयोगशाळा, एक्सरे, औषध, नवजात शिशु, प्रसूतीगृह, शस्रक्रिया, अपघात आदी विभाग असणार आहेत. ३० खाटांच्या रुग्णालयाला २७ कर्मचारी मंजूर असून तेही रुग्णालय सुरू होताच उपलब्ध होणार आहेत. आयसीटीसी, आयुष, एनसीडी व आरबीएसके आदी विभागही सुरू करून यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे.
-----------------------------------------
खर्डी ग्रामीण रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. रुग्णालयातील तांत्रिक अडचणी सोडविण्याचे काम सुरू असून पूर्ण कर्मचाऱ्यांची नेमणूक करून रुग्णालय खुले करण्यात येईल.
-डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.
--------------
रुग्णालयाची इमारत भव्यदिव्य असल्याने येथे ५० खाटांचे रुग्णालय सुरू करावे, त्यात तज्‍ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करून येथील अतिदुर्गम भागातील व अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचार मिळतील.
-अनिल पातकर, समाजसेवक.