
बोईसरमधील शासकीय जमिनीवर अतिक्रमण
मनोर, ता.२७ (बातमीदार) ः बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील दांडीपाडा भागातील साई नगर येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काही दिवसांपूर्वीच काढण्यात आले होते. पण, याठिकाणी परत एकदा अतिक्रमण केले जात असल्याचे आढळून आले आहे. महसूल विभागाच्या कारवाईनंतरही भूमाफियांकडून शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे शासकीय जमिनीच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दांडीपाड्याच्या साईनगर परीसरातील सर्व्हे क्रमांक १२,७,२७/१ आणि ६५/४६ मधील सुमारे पाच एकर क्षेत्र असलेल्या भूखंडामधील मोकळ्या भागात अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर सात महिन्यांपूर्वी तहसीलदार सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत तोडक कारवाई करण्यात आली होती. तोडक कारवाईला सहा महिन्यांचा कालावधी उलटताच पुन्हा या जागेला तारेचे कुंपण घालून जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी अनधिकृत चाळी आणि गाळे बांधण्यात येणार असल्याचे समजते. शासकीय जागा बळकावण्यासाठी भुमाफियांना बोईसर ग्रामपंचायतीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप केला जात आहे. बोईसरमधील शासकीय जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत इमारती, चाळी आणि गळ्यांची बांधकामे फोफावत असताना तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
-------------
बोईसरमधील सर्व्हे क्रमांक १२,७,२७/१ आणि ६५/४६ या शासकीय जमिनीवर अतिक्रमण सुरू असल्याची तक्रार मंडळ आधिकारी बोईसर यांच्याकडे प्राप्त झाली आहे. चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.
- सुनील शिंदे, तहसीलदार, पालघर