
बोगस डॉक्टर पती-पत्नीविरोधात गुन्हा
भिवंडी, ता. २७ (बातमीदार) : शहर परिसरात मोठ्या संख्येने कामगार वस्ती असून त्यापैकी झोपडपट्टी भागांमधून बोगस डॉक्टर सर्रासपणे सर्वसामान्य नागरिकांवर औषध उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळ करीत आहेत. याबाबत अनेक तक्रारी महापालिका आरोग्य विभागाकडे होत असतात. शहरातील हमाल वाडा या परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघा पती-पत्नीवर महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोमीन मुशर्रफ नूर मोहम्मद अशरफी (४६) व रायला मुशर्रफ मोमीन (४०) असे कारवाई झालेल्या बोगस डॉक्टर पती-पत्नीचे नाव आहे. दोघे बोगस डॉक्टर स्वतः कडे वैद्यकीय पदवी नसताना व मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी झालेली नसताना आवामी इमदादी क्लिनिक उघडून त्या ठिकाणी नागरिकांवर उपचार करीत होते. १ ते १० ऑगस्ट २०२२ दरम्यान या बोगस डॉक्टरांनी तनवीर गुलाम मुस्तफा मोमीन (५२) यांच्यावर उपचार करीत वेगवेगळ्या वैद्यकीय तपासण्या करायला भाग पाडून चुकीच्या पद्धतीने दवा उपचार केले. त्यामध्ये तनवीर गुलाम मुस्तफा मोमीन यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार मृतांच्या नातेवाईकांकडून पालिका आरोग्य विभागाकडे आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. शमीम सलाम अन्सारी यांनी त्याठिकाणी कारवाई केली.