
भिवंडीतील उपविभागीय अधिकाऱ्यांचे निलंबन
भिवंडी, ता.२७ (बातमीदार) : भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालय मागील तीन ते चार वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अनेक शासकीय प्रकल्पासाठी भूसंपादन करीत असलेल्या जागेच्या व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. या प्रकरणी अखेर विधान परिषदेमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर व विद्यमान उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे.
भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातून मुंबई-बडोदरा महामार्ग, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग यांसह अनेक प्रकल्प जात असून त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांचा कोट्यवधींचा मोबदला देताना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आली. त्यामध्ये साडे अकरा कोटी रुपयांचा मोबदला परस्पर बोगस शेतकऱ्यांना देणे, त्यानंतर ५८ लाखांचा मोबदला मयत आदिवासी महिलेच्या जागी बोगस महिला उभी करून लाटण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी गुन्हे दाखल असतानाच अंजुर येथील आदिवासी शेतकरी उंदऱ्या दोडे यांच्या बुलेट ट्रेनमध्ये बाधित जमिनीचा मोबदला देण्यास उपविभागीय अधिकारी बाळासाहे वाकचौरे हे टाळाटाळ करत असल्याचे प्रकरण समोर आले होते. दरम्यानच्या काळात उंदऱ्या दोडे यांचे निधन झाल्याने उपविभागीय अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्या वरील चर्चेस उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर व विद्यमान उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्यावर शासन निलंबनाची कारवाई करीत असल्याची घोषणा केली.