
दोन रशियन नागरिक अटकेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबई पोलिसांनी २६ डिसेंबरल रशियातील दोन नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन्ही रशियन नागरिक यूट्युबर्स असून स्टंट व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी ताडदेव परिसरातील इम्पिरियल ट्विन टॉवर्समध्ये घुसले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. ताडदेव येथील हायप्रोफाईल ६० मजली निवासी ट्विन टॉवरमध्ये शहरातील अनेक उच्चभ्रू कुटुंबे राहतात. परदेशी नागरिक स्टंटबाजी करताना पाहून इमारतीच्या सुरक्षा रक्षकांनी ताडदेव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही यूट्युबर्सवर आयपीसी कलम ४५२ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रशियन तरुणांपैकी एकाचे नाव मॅक्सिम शचेरबाकोव्ह असून तो २५ वर्षांचा आहे आणि दुसऱ्याचे नाव रोमन प्रोशिन असून तो ३३ वर्षांचा आहे. सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर या यूट्युबर्सना पकडण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.