हेवेदाव्यांमुळे पनवेलची कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेवेदाव्यांमुळे पनवेलची कोंडी
हेवेदाव्यांमुळे पनवेलची कोंडी

हेवेदाव्यांमुळे पनवेलची कोंडी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता.२७ ः पनवेल महापालिका हद्दीतून जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-गोवा आणि जेएनपीटी महामार्गावर जीवघेणी वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आखण्यात आला होता. पण या वार्डनला दिले जाणारे किमान वेतन आणि नियुक्त्यांवरून महापालिका आणि वाहतूक पोलिसांमधील मतभेदांमुळे हा प्रस्ताव रखडला आहे. परिणामी, मनुष्यबळाच्या अभावामुळे वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करण्याची वेळ मात्र पनवेलकरांवर आली आहे.
बेलापूर येथे नवी मुंबई महापालिकेची हद्द सोडल्यानंतर सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे जलदगती महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग आणि जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग हे महामार्ग सर्वाधिक व्यस्त रस्त्यांपैकी एक आहेत. तसेच हे महामार्ग मुंबई, पुणे व गोवा या मुख्य शहरांना जोडणारे असल्यामुळे या मार्गावरून सामान्य नागरीकांसोबत अति महत्त्वाच्या व्यक्तीही प्रवास करीत असतात. त्यामुळे या मार्गावरील होणारी वाहतूक कोंडी अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे. या मार्गावरील दोन ते तीन किलोमीटरच्या वाहनांच्या लागणाऱ्या रांगांमुळे अनेकदा रुग्णवाहीका अडकण्याचे प्रकारही झाले आहेत. त्यामुळे या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी पनवेल महापालिकेला ५० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याची सूचना केली होती.
--------------------------
का रखडला प्रस्ताव ?
या प्रस्तावाला महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत सहा हजार रुपये प्रति महिना मानधन देण्याची तयारी दर्शवली होती. पण तुटपुंजे वेतन असल्याने वॉर्डन पुरवणाऱ्या ठेकेदारांनी या प्रस्तावाला नकार दिला होता. अखेर पालिकेने वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उद्देशाने ट्रॅफिक वॉर्डनला ११ हजार ५०० रुपये महिना मानधन देण्याचे प्रस्ताव मंजूर केला. परंतु, हे वेतन सुद्धा सरकारने ठरवून दिलेल्या किमान वेतनापेक्षा कमी असल्याने महापालिकेनेच त्यांची नियुक्ती करावी, असे पत्र वाहतूक पोलिसांनी महापालिकेला दिले आहे. तेव्हापासून ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याचा प्रस्ताव धूळ खात पडला आहे.
------------------------------------
अपुऱ्या मनुष्यबळामुळे नियोजनाचा प्रश्न
नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडे सद्यःस्थितीत असणारे मनुष्यबळ पाहता महत्त्वाच्या महामार्गावर वाहतुकीचे नियोजन करणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत नव वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून पुणे, लोणावळा, कोकणात जाणारे एकाच दिवशी सायन-पनवेल महामार्गावरून प्रवास करत असल्याने ट्रॅफिक वॉर्डन नसल्याने पोलिसांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
---------------------------------
ट्रॅफिक वार्डन नेमण्यासाठी किमान वेतनानुसार मानधन देण्यास महापालिका तयार आहे. परंतु, वाहतूक नियमांमध्ये महापालिकेला ज्ञान नसल्याने वॉर्डन नेमण्याचे काम वाहतूक पोलिस प्रशासनाने करावे.
-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका
--------------------------------
महापालिकेने निश्चित केलेले मानधन ट्रॅफिक वॉर्डनला कमी पडत आहे. तसेच ते किमान वेतनानुसार द्यावे, असे पत्र महापालिकेला दिले आहे. तसेच महापालिकेने त्यांची नियुक्ती करून परिचलनासाठी आम्हाला द्यावे.
-संजय नाले, पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलिस
-------------------------------
पनवेल महापालिका हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी सोडवणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याबाबत वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्तांसोबत चर्चा केली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सकारात्मक निर्णय घेऊ, असे त्यांनी आश्वासन दिले आहे.
-चंद्रशेखर सोमण, स्थानिक शिवसेना नेते, पनवेल