कल्याण - कसारा मार्गिकेचे काम संथ गतीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण - कसारा मार्गिकेचे काम संथ गतीने
कल्याण - कसारा मार्गिकेचे काम संथ गतीने

कल्याण - कसारा मार्गिकेचे काम संथ गतीने

sakal_logo
By

कल्याण, ता. २७ (बातमीदार) ः मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावरील तिसरी चौथी मार्गिका बनवण्यासाठी भूसंपादनाचे काम अतिशय संथ गतीने होत आहे. या मार्गावर १० वर्षांहून अधिक काळ काम रखडले आहे. त्यामुळे या मार्गावर लोकलच्या वाढीव लोकल फेऱ्याचे प्रवाशांचे स्वप्न कधी पूर्ण होणार असा सवाल नागरिक विचारत आहेत.

कल्याण - कसारा दुहेरी रेल्वे मार्ग असल्याने या मार्गावर एक्सप्रेस, लोकल आणि मालगाडी धावते. कल्याणपुढील टिटवाळा, आसनगाव, कसारा आदी परिसरात लोकवस्ती वाढल्याने प्रवासी संख्या वाढत आहे. या मार्गावर मालगाडीचे इंजिन बंद पडण्याचे प्रकार वाढत असल्याने त्याचा परिणाम लोकल सेवेवर होतो. त्यासाठी लोकल फेऱ्या वाढवा अशी मागणी कल्याण - कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेसह प्रवासी वर्गाकडून अनेक वर्षांपासून होत आहे. पण, या फेऱ्या वाढवणे तिसरी आणि चौथी मार्गिका झाल्यासच शक्य आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पण, ही मार्गिका होणार कधी हा प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहिला आहे.

रेल्वे प्रशासनाने कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका बनवण्यासाठी सन २०११ मध्ये मंजुरी दिली होती. काम पूर्ण करण्याचे ध्येय २०२० होते. मात्र, भूसंपादन न झाल्याने हा मार्ग रखडला आहे. दोन वर्षांपूर्वी या मार्गावर सुमारे २७७.७० कोटी खर्चासाठी तरतूद होती. मात्र १० वर्षांहून अधिक काळ लोटल्याने या प्रकल्पाची किंमत ७९२.८९ कोटींवर पोहचली आहे. प्रकल्प रखडल्याने सरासरी एक हजार कोटींहून अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. या मार्गावर छोटे आणि मोठे पूल होणार असून त्यातील ५ पुलांचे बांधकाम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने निविदा काढत ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. कामे प्रगतीपथावर आहेत. २ पुलांच्या बांधकामासाठी ठेकेदाराची नेमणूक बाकी असल्याचे समजते. वन विभाग जमीन, सरकारी जमीन आणि खासगी जमीन भूसंपादन करण्याचे काम सुरू असून लवकरच काम मार्गी लागेल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
--------
२५ हेक्टर भूसंपादन बाकी
कल्याण ते कसारा रेल्वे मार्ग अंतर ६७.६२ किलोमीटर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेसाठी ४६.८ हेक्टर जमीन लागणार आहे. २१.८ हेक्टर जमीन संपादित केली असून अजून २५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन बाकी आहे.