शिवसेनेचा सायकल ट्रॅकला विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचा सायकल ट्रॅकला विरोध
शिवसेनेचा सायकल ट्रॅकला विरोध

शिवसेनेचा सायकल ट्रॅकला विरोध

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिकेकडून पाम बीच मार्गावर सायकल ट्रॅक बनवण्यासह परिसराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे; मात्र पाम बीचवरील सायकल ट्रॅकचे काम नियमबाह्य पद्धतीने होत असून या कामात तेथील हिरवळीसह लहान-मोठी झाडे तोडण्यात येत असल्याची तक्रार शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख विजय माने यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या संबंधित अभियंत्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबई महापालिकेने पाम बीच मार्गालगत ११.५८ कोटी रुपये खर्च करून सायकल ट्रॅक बनवण्याचे काम सुरू केले आहे. सदरचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे तसेच महापालिकेच्या स्थापत्य विभागाने लाखो रुपये खर्च केलेल्या कामांचीदेखील तोडफोड होत असल्याचे माने यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच पाम बीच मार्गावर सायकल ट्रॅकचे काम चालू झाल्यावर तेथे असलेली हिरवळ, लहान-मोठी झाडे तोडण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात विकास कामे झाली पाहिजेत, नागरिकांना सेवा, सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत; मात्र सदरची कामे होत असताना निसर्गाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे या नियमबाह्य कामाची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने संबंधित अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विजय माने यांनी केली आहे.