सिडको इमारतींमध्ये बेकायदेशीर व्यावसाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडको इमारतींमध्ये बेकायदेशीर व्यावसाय
सिडको इमारतींमध्ये बेकायदेशीर व्यावसाय

सिडको इमारतींमध्ये बेकायदेशीर व्यावसाय

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ ः वाशीतील सिडकोनिर्मित इमारतींमध्ये बेकायदेशिररित्या सुरू असलेल्या व्यवसायांची लक्तरे आज (ता.२७) हिवाळी अधिवेशनात काढण्यात आली. आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी मांडून वाशी विभाग कार्यालयातील विभाग प्रमुख, अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचारी आणि फेरीवाल्यांच्या कारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच बेकायदा घटनांना आशीर्वाद देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

वाशी सेक्टर ९, १०, १, २, ३, ४ भागात सिडकोने सुमारे ४० वर्षांपूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपासून ते अगदी अल्प व उत्पन्न गटापासून उच्च उत्पन्न गटाकरिता सदनिका बांधल्या होत्या. यात अनेकांनी तळ मजला व पहिल्या मजल्यावरील जागा रहिवासी वापराऐवजी किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स, हॉटेल्स, सलून-ब्युटी पार्लर, बँक एटीएम, मिठाईची दुकाने, दूध डेअरी, भाजीपाला विक्री, वाहनांची टायर विक्री व दुरूस्तीसाठी बेकायदेशीररित्या भाडे करारावर दिलेली आहे. वाशी सेक्टर -१० येथे सिडकोनिर्मित  एफ टाईप रेन्बो व इतर  सोसायटीच्या इमारतीमध्ये व्यावसायिक गाळे असताना देखील तेथील सोसायटीच्या अंतर्गत आणि बाह्य जागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान थाटले आहे. पालिकेने याठिकाणी पे आणि पार्क करिता नियोजन केलेले असताना देखील त्याठिकाणची जागा फेरीवाले बिनधास्तपणे वापरत असल्याची बाब प्रभू यांनी मांडली.
महापालिका आयुक्तांना बँक ऑफ बडोदा समोरील पदपथावर बसणाऱ्या फेरीवाल्यांचे फोटो काढून पाठवल्यानंतर कारवाई केली. मात्र, पुन्हा फेरीवाले तसेच बसले त्याची खंत प्रभू यांनी व्यक्त केली. एफ टाईप रेनबो ही इमारत ४० वर्षे जुनी असून तिची दुरवस्था झाली असताना या इमारतीमध्ये लिफ्ट बसवण्यात आल्याचे लक्षवेधीत सांगण्यात आले. वाशी विभाग कार्यालयाने वाशी कोपरखैरने मुख्य रस्त्यालगत असलेल्या सेक्टर ९ आणि १० मधील  पदपथावर फेरीवाले बसू नयेत म्हणून सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत. शनिवार-रविवार सायंकाळी तर या  पदपथाला आठवडा बाजाराचे स्वरूप आलेले असते. नागरिकांना चालण्यासाठी जागा शिल्लक नसते. त्यामुळे या वेळी हे सुरक्षारक्षक कुठे गायब झालेले असतात हा प्रश्न प्रभू यांनी विचारला.