
कारच्या धडकेत वृद्ध सुरक्षारक्षकाचा मृत्यू
अंधेरी, ता. २७ (बातमीदार) : सांताक्रूझ येथे कारच्या धडकेत वयोवृद्ध सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २५) घडली. सदानंद खोपडे (६०) असे सुरक्षारक्षकाचे नाव असून, त्यांच्या मृत्यूप्रकरणी कारचालक गिरधारीलाल सखराणी (६०) यांच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवला आहे. रविवारी रात्री कामावर असताना, जेवणाची वेळ झाल्याने सदानंद कालिना येथे जेवणासाठी जात होते. रस्ता ओलांडत असताना त्यांना कारने जोरात धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेत सदानंद यांना स्थानिकांनी तातडीने व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी अमनराज पांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गिरधारीलाल सखराणी यांना गुन्हा नोंदवून अटक केली. अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वाम अभ्यंकर यांनी सांगितले.