
खंडणीप्रकरणी फरारी जी नगरसेवकास अटकेत
मुंबई, ता.२७ : शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) माजी नगरसेवक योगेश भोईर यांना मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ कडून खंडणी प्रकरणी मंगळवारी (ता.२७) अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट ११ ने योगेश भोईरला सुमारे ३ तास चौकशीनंतर अटक केली. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
मुंबईतील एका विकसकाकडून १ कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणात योगेश भोईर हे नाव पुढे आले. बांधकाम कंपनीचे कर्मचारी हर्षल मोरे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात प्राथमिक आरोपी भीमसेन यादव हा विकसकाविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करत होता आणि कांदिवली येथे सुरू असलेले इमारतीचे बांधकाम थांबण्याचा प्रयत्न करत होता. भीमसेन यादव याच्या छळाला कंटाळून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यादव यांना एका बैठकीसाठी बोलावले. बैठकीत यादव याने सुरुवातीला २ कोटी रुपयांची मागणी केली. अखेर बांधकाम सुरू ठेवण्यासाठी १ कोटी रुपयांची तडजोड केली. ही रक्कम बृहन्मुंबई महापालिका अधिकारी आणि राजकारण्यांना वाटून घ्यावी लागेल, असे यादव याने मोरे यांना सांगितले. त्यानंतर आरोपी यादव कांदिवली येथील कार्यालयात रकमेचा पहिला हप्ता घेण्यासाठी आला असता पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान भीमसेन यादव याने माजी नगरसेवक योगेश भोईरचा या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना दिली. तेव्हापासून माजी नगरसेवक योगेश भोईर पोलिसांच्या नजरेतून फरार झाले होते.