
श्रमजीवी संघटनेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत दिव्या खोडका अव्वल
खर्डी, ता. २८ (बातमीदार) : श्रमजीवी संघटनेच्या वतीने उसगाव डोंगरी विधायक संसद येथे साने गुरूजी जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेत शहापूर तालुक्यातील जुनवणी गावातील दिव्या खोडका हिने रांगोळी, निबंध, चित्रकला या तीनही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत अव्वल ठरली आहे. श्रमजीवी संघटनेच्या वतीने साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय बाल कला-क्रीडा सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यातील नाशिक, पालघर, ठाणे या जिल्ह्यातील १४०० पेक्षा जास्त मुलामुलींनी सहभाग घेतला होता. शहापूर तालुक्यातील दिव्या खोडका या शहापूर येथील जुनवणी गावातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थिनीने रांगोळी, चित्रकला, निबंध या तिन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शहापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.