
कडधान्य पिके नील गायींकडून फस्त
मुरबाड, ता. २८ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील भादाणे परिसरातील शेतकऱ्यांची कडधान्य, भाजीपाला पिके व माळरानावर लावलेली आंबा, पेरू, चिकूची रोपे नील गायींनी उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे वन विभागाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
वडवली, शिंदी पाडा, संगम, शिळ परिसरात सुमारे २० नील गायींचा कळप फिरत आहे. हा कळप पहाटेच्या वेळेस शेतात घुसून नुकसान करत आहे. शेताला कुंपण केले असले तरी या गायी आठ ते दहा फूट उंच उडी मारून शेतातील पिके उद्ध्वस्त करत आहेत. चवळी, वाल, हरभरा, उडीद, मटकी अशी कडधान्य पिके आंबा, चिकू, पेरू या फळझाडांची रोपे नील गायींनी फस्त केल्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांना वन विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भादाणे येथील शेतकरी केशव हांडोरे यांनी मुरबाड येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
-----------------
फटाके फोडण्याचा उपाय
रात्री जागून काढून गायींना हाकलून लावण्यासाठी शेतकरी फटाके फोडणे, पत्र्याचे डबे वाजवणे असा उपाय करत आहेत, पण या गायी तात्पुरती माघार घेतात व पुन्हा शेतात घुसून पिके फस्त करतात, असे भादाणे येथील शेतकरी प्रशांत हांडोरे यांनी सांगितले. वन विभागाने या नील गायींचा बंदोबस्त करावा व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.