आतंरराष्ट्रीय रग्बी खेळाचे खारघर केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आतंरराष्ट्रीय रग्बी खेळाचे खारघर केंद्र
आतंरराष्ट्रीय रग्बी खेळाचे खारघर केंद्र

आतंरराष्ट्रीय रग्बी खेळाचे खारघर केंद्र

sakal_logo
By

खारघर, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई क्षेत्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याचा मानस सिडकोकडून आखला गेला आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॅालच्या मैदानानंतर आता इंडियन रग्बी फुटबॉल युनियनला रग्बी खेळाच्या मैदानासाठी जागादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात खारघर आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाचे केंद्र बनणार आहे.
खारघर सेक्टर ३३ मध्ये १०.७ हेक्टर जमिनीवर सिडकोकडून फुटबॉलसाठीची चार मैदाने विकसित करण्यात आली आहेत. त्यापैकी तीन मैदानांचे काम पूर्ण झाले असून चौथ्या मैदानाचे काम सुरू आहे. दरम्यान, या मैदानांपासून हाकेच्या अंतरावर रांजणपाडा गावाशेजारील खाडीकिनारी रग्बी या मैदानी खेळासाठी सिडकोकडून साडेतीन एकर जागा अकरा वर्षांच्या लीजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा खेळ जरी पाश्चात्त्य देशांमध्ये खेळला जातो, तरी गेल्या काही वर्षांत देशातील विविध राज्यांत खेळला जात आहे. रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अकोला, बुलडाणा, वाशीम, बीड, परभणी, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, नाशिक, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, मुंबई उपनगर आणि मुंबई अशा अठावीस जिल्ह्यांत हा खेळ खेळला जातो. त्यामुळे भविष्यात नवी मुंबई शहरातूनही रग्बी खेळातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत.
------------------------------------
जिगरबाज खेळाचा नावलौकिक
जगातील सर्वाधिक जिकरीचा आणि जिगरबाज खेळ म्हणून रग्बी खेळाची ओळख आहे. रग्बी हा खेळ एक सांघिक खेळ असून प्रत्येक संघामध्ये पंधरा-पंधरा खेळाडू असतात. दुसऱ्या संघाला पराभूत करण्यासाठी खेळाडूंचा कस या खेळात लागत असतो. तसेच हा खेळ फुटबॉलचा एक प्रकार असून रग्बी फुटबॉल संघटना अंतर्गत तो खेळला जातो.
------------------------------------
सिडकोकडून खाडी किनाऱ्यावर साडेतीन एकर जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी रग्बी-फुटबॉल केंद्र उभारण्यात येणार आहे. खाडी किनारी ही जागा असल्यामुळे वन, पर्यावरण विभाग, पालिकेच्या परवानगीनंतर सहा महिन्यांत मैदान विकसित करण्यात येणार आहे.
- संदीप मोसमकर, सहसचिव, रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र.