
नेरूळमध्ये बेकायदा पार्किंगचा मनस्ताप
नेरूळ, ता. २८ (बातमीदार)ः नेरूळ विभागात वाहन पार्किंगची मोठी समस्या आहे. अशातच वर्दळीचे रस्ते आणि पदपथांवर बेकायदा वाहने पार्किंग केली जात असल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
नेरूळ सेक्टर १०, ४, २ येथील परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. या परिसरातील ग्रेट ईस्टर्न गॅलरी या इमारतीमध्ये विविध खासगी कंपन्यांची कार्यालये, बँका असल्याने वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेक इमारतींबाहेरील रस्ते आणि पदपथांवरच वाहने उभी केली जात आहेत. विशेष म्हणजे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ज्या ठिकाणी नो पार्किंग झोन करण्यात आलेले आहेत. त्याच ठिकाणी वाहने उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यात नेरूळमधील डेपोच्या आवारातच खासगी वाहनांची बेकायदा पार्किंग केली जात असल्याने प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच नेरूळ सेक्टर १० मधील स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही हीच समस्या असल्याने पदपथांऐवजी वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्यावरून चालण्याची वेळ आल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे.
------------------------------
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या पदपथावर वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होते. त्यामुळे अशा बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
- श्रीधर जगताप, नागरिक