
वाचन संस्कृतीच्या सभेकडे नगरसेवकांची पाठ
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : डोंबिवली शहर हे सुशिक्षितांचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. डोंबिवलीत वाचक, श्रोतेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. वाचन संस्कृती वाढावी यासाठी डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या वतीने पुस्तक आदानप्रदान उपक्रमानिमित्त डोंबिवलीमधील सर्वपक्षीय नगरसेवकांची सभा बोलावली होती. या सभेला डोंबिवलीमधील एकाही माजी नगरसेवकाने उपस्थिती लावली नाही. नगरसेवकांच्या या अनुपस्थितीमुळे सांस्कृतिक नगरीतील नगरसेवकांना वाचन संस्कृतीचे वावडे आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या वतीने बहुभाषीय पुस्तक आदानप्रदान प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या वर्षी या सोहळ्याचे पाचवे वर्ष आहे.
याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (ता. २७) डोंबिवलीतील श्री गणपती मंदिरात ‘आम्ही नगरसेवक डोंबिवलीचे, वारकरी वाचन संस्कृतीचे’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तक आदानप्रदान प्रदर्शनाची माहिती शहरातील प्रत्येक घराघरात पोहोचावी, या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद लाभावा यासाठी डोंबिवलीकर सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये माजी मंत्री जगन्नाथ पाटील हे नगरसेवकांना मार्गदर्शन करणार होते. वाचन संस्कृतीचे महत्त्व, घराघरात हा उपक्रम कसा पोहोचवावा, या उपक्रमास आपले योगदान कसे देता येईल, आपण या चळवळीला हातभार लावू शकतो का याची माहिती माजी मंत्री पाटील हे नगरसेवकांना देणार होते. डोंबिवली मधील सुमारे ४० ते ४५ नगरसेवकांना आयोजकांनी या सभेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते; मात्र प्रत्यक्षात सभेला कल्याण-डोंबिवलीमधील एकही माजी नगरसेवक उपस्थित न राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.