मॅटिल्डाच्या कथांना वसईच्या मातीचा गंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॅटिल्डाच्या कथांना वसईच्या मातीचा गंध
मॅटिल्डाच्या कथांना वसईच्या मातीचा गंध

मॅटिल्डाच्या कथांना वसईच्या मातीचा गंध

sakal_logo
By

विरार, ता. २८ (बातमीदार) : मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा यांच्या कथा इथल्या मातीशी एकरूप झालेल्या आहेत. या कथांना वसईच्या मातीचा, भाज्यांचा गंध व गावठी गुलाब फुलांचा दरवळ येतो. त्यांच्या लिखाणात वसईतील हिरवा ताजेपणा आहे, असे प्रतिपादन वसईतील विचारवंत व साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले.
वसईच्या नवोदित लेखिका मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा यांच्या ‘निवांत’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘ग्रंथाली’ संस्थेतर्फे मर्सेस येथे पार पडले. यावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो बोलत होते. या समारंभाचे अध्यक्ष मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया, डॉ. सिसिलिया कर्व्हालो, सुदेश हिंगलासपूरकर आदी उपस्थित होते. लेखिका मॅटिल्डा व त्यांचे पती अँथनी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
साहित्य कसे निर्माण होते हे स्पष्ट फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणाले की, समाजात जे जे घडत असते, त्याचे प्रतिबिंब मनात खोलवर जाते, चिंतनशील मनुष्य त्यावर विचार करायला लागतो, त्याला लिहावेसे वाटते आणि ते शब्दरूप मांडल्यावर साहित्याची निर्मिती होते. ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर यांनी आपल्या मनोगतात संवाद साधताना ग्रंथालीचे कार्य सर्वांसमोर ठेवले. मराठीच्या शिक्षिका व लेखिका असलेल्या अचला मच्याडो यांच्या सहजसुंदर सूत्रसंचालनाने गुंफलेला, कृत्रिमतेचा लवलेश नसलेला असा हा सोहळा रंगला.

नाताळच्या चांदणीची उपमा
मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया यांनी लेखिकेला नाताळच्या चांदणीची उपमा देताना ही चांदणी आता प्रकाशमान झाली आहे. तिला लघुकथेचे तंत्र आणि मंत्र गवसले आहे, असे सांगून पुस्तक खूप दर्जेदार झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सिलीन डिसिल्वा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. उज्ज्वला लेमॉस यांनी प्रास्ताविक तर दीपक मच्याडो यांनी आभार मानले.