महत्त्वाच्या चर्चपैकी एक संत मेरी मॅग्दलेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महत्त्वाच्या चर्चपैकी एक संत मेरी मॅग्दलेन
महत्त्वाच्या चर्चपैकी एक संत मेरी मॅग्दलेन

महत्त्वाच्या चर्चपैकी एक संत मेरी मॅग्दलेन

sakal_logo
By

गाथा ख्रिस्त मंदिरांची
संदीप पंडित
......
वसईतील काही महत्त्वाच्या चर्चमध्ये ज्याची गणना केली जाते, यात मुळगाव येथील संत मेरी मॅग्दलेन चर्चचा समावेश आहे. हे चर्च पालकीय कारभार सुव्यवस्थेसाठी संत जॉन डिनरी, पापडीच्या कार्यकक्षेत येते. मुळगाव धर्मग्रामपूर्वी हा भाग येथून तीन किमीवर वसलेल्या पाली धर्मग्रामाचा भाग होता.
पूर्वीच्या काळात वाहतुकीच्या सोयी उपलब्ध नसल्याने मुळगांवमधील ग्रामस्थांना चर्चमध्ये जाणे-येणे अडचणीचे होत होते. पावसाळ्यात जागोजागी साचलेले पाणी, खराब रस्ते यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत असे; तर दुसऱ्या बाजूने धर्मगुरूंनाही वेळी-अवेळी ग्रामस्थांच्या आध्यात्मिक गरजा भागविण्यासाठी धावून जाणे जिकीरीचे होत असे. या सर्व अडचणी लक्षात घेऊन आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मुळगावसाठी स्वतंत्र धर्मग्रामाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी पाली पॅरिशचे फा. जे. एस्. मिरांडा आणि फा. रेमंड मेंडीस यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. जुने चर्च उदयास येण्यापूर्वी सध्याच्या चर्च परिसरात एक छोटेसे छप्परवजा ‘चॅपल’ बनविण्यात आले. जे स्थानिक परिसरातील उपलब्ध साहित्यातून उभारले गेले होते. त्यानंतर २२ जुलै १९४५ रोजी संत मेरी मॅग्दलेनाच्या सणाच्या दिवशी स्वतंत्र मुळगाव धर्मग्राम उदयास आले. ख्रि. फा. आयरेस फर्नांडिस मुळगाव धर्मग्रामाचे पहिले प्रमुख धर्मगुरू होते. सुरुवातीला १९४५ ते १९४९ या कालावधीत चर्चनजीक निवासस्थान नसल्याने धर्मगुरू कृपामाता चर्च, पापडी येथे राहत असत. त्यानंतर १९४९ मध्ये ख्रि. फा. विन्सेन्ट डिसोजा यांनी चर्चशी सलग्न असे धर्मगुरूंसाठी निवासस्थान बांधले आणि तिथे राहण्यास सुरुवात केली. १९५६ ते १९६७ या काळात ख्रि. फा. क्लेमेंट डिसा हे चर्चचे प्रमुख धर्मगुरू होते. त्यांची समर्पित निष्ठा, कठोर मेहनत व त्याला धर्मग्रामस्थांच्या सहकार्याची मिळालेली जोड याचा उत्तम परिपाक म्हणजे चर्चच्या आवारात प्राथमिक शाळेची इमारत उभी राहिली. फा. क्लेमेंट डिसा यांचे अथक परिश्रम आणि धर्मग्रामस्थांची त्यागवृत्ती यांच्या समन्वयातून चर्चच्या नव्या वास्तूची कोनशिला ठेवली गेली. ख्यातनाम स्थापत्यविशारद जे. बी. फर्नांडिस आणि मुळगावचे भूमिपुत्र शेव्ह. इ. एस. अंन्ड्राडिस या दोघांनी नव्या चर्चवास्तूच्या उभारणीची जबाबदारी स्वीकारली. १२ नोव्हेबर १९६६ रोजी ख्रि. व्हॅलेरियन कार्डिनल ग्रेशियस यांच्या हस्ते चर्चच्या भव्य वास्तूचा समर्पणविधी पार पडला.
==========================================
संपूर्ण जगभर ख्रिस्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मानवाने कसे जगावे हे शिकविण्यासाठी देव मानवाच्या रूपामध्ये पृथ्वीवर आला. दरवर्षी ख्रिस्त जयंतीच्या वेळी हा संदेश परमेश्वर मानवाला देत असतो. देव अजूनही आपल्यावर प्रेम करतो म्हणूनच तो आपल्यासारखा बनून आपल्याला देवासारखे बनण्यासाठी मदत करत असतो. हा संदेश प्रत्येक व्यक्तीने ख्रिस्त जयंती आणि संपूर्ण वर्षभर आपल्या डोळ्यांसमोर ठेऊन पवित्र जीवन जगावे.
- फादर विजय अलमेडा, प्रमुख धर्मगुरू