
सायकल ट्रॅकसाठी पर्यावरणाचा ऱ्हास
नेरूळ, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेकडून पाम बीच मार्गावर सायकल ट्रॅक बनवण्यासह परिसराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू असलेल्या या सायकल ट्रॅकच्या काम नियमबाह्य होत असून यासाठी अनेक झाडे तोडण्यात येत आहेत, अशी तक्रार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शहरप्रमुख विजय माने यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या संबंधित अभियंत्याविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
शहरात विकासकामे झाली पाहिजेत; नागरिकांना सेवा सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत; परंतु कामे करताना निसर्गाचे संवर्धन राखण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. नवी मुंबई महापालिकेने पाम बीच मार्गालगत सायकल ट्रॅक बनवण्याचे काम सुरू केले आहे. परंतु या सायकल ट्रॅकचे काम नियमबाह्य पद्धतीने होत आहे. या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास आणि महापालिकेच्या स्थापत्य विभागाने लाखो रुपये खर्च केलेल्या कामांचीही तोडफोड होत आहे. तसेच पांभीर मार्ग येथील सायकल ट्रॅकचेही काम चालू झाले होते. तेथे असलेली हिरवळ, लहान-मोठी झाडे तोडण्यात येत आहेत, ही बाब माने यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या संबंधित अभियंत्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
आम्ही कोणत्याही प्रकारच्या झाडांना इजा न पोहोचवता आणि त्यांना वाचवून काम केले आहे. यासंदर्भात आरएफओ आणि डीएफओ यांच्या अहवालानुसार बाधित होणाऱ्या झाडांबाबत निर्णय घेण्यासाठी एमसीझेडएमए आणि सीआरए या दोन शासकीय संस्थांकडून परवानगी घेतलेली आहे. या दोन संस्थांसोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त महापालिकेला प्राप्त होताच मुंबई उच्च न्यायालयाकडून या कामासाठी परवानगी घेऊ; मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास केलेला नाही. तसेच नियमबाह्य पद्धतीने काम केलेले नाही.
- गिरीश गुमास्ते, कार्यकारी अभियंता, नेरूळ