
३१ डिसेंबरनिमित्त मांसाहारी चषक स्पर्धा
विक्रमगड, ता. २८ (बातमीदार) : ग्रामीण भागात क्रिकेटने तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. प्रत्येक गावा-गावांत क्रिकेट सामने भरवले जात आहेत. आता ३१ डिसेंबरनिमित्त काहीतरी वेगळेपण यावे यासाठी विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे (माडाचा पाडा) या छोट्याशा पाड्यात ३१ डिसेंबरनिमित्त अस्सल मांसाहारी चषक २०२२ भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रिकेटप्रेमी यंगस्टार क्रिकेट क्लब माडाचापाडा यांच्या वतीने या भव्य अंडरआर्म स्पर्धा क्रिकेट स्पर्धा असणार आहेत. गुरुवार (ता. २९) पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धा २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत खेळवल्या जाणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेबाबत क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. आतापर्यंत अनेक स्पर्धा पाहिल्या असतील, ऐकल्या असतील, त्या स्पर्धांची बक्षीसही रोख रक्कम व चषक अशा स्वरूपात असते; पण ही स्पर्धा ३१ डिसेंबरनिमित्त क्रिकेटरसिक यांच्यासाठी वेगळी ठरणार आहे.
--------------------
अशी आहेत बक्षिसे
विजेत्या संघाला चक्क एक बोकड आणि चषकऐवजी एक दारूची बाटली बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला दहा गावठी कोंबडे आणि एक दारूची बाटली; तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला पाच गावठी कोंबडे आणि एक दारूची बाटली दिली जाणार असल्याचे आयोजकांकडून पत्रक काढण्यात आले आहे. तसेच सलग दोन षटकार, दोन चौकार, दोन विकेट काढणाऱ्या खेळाडूला एनर्जी ड्रिंक दिले जाणार आहे. ३१ डिसेंबरनिमित्त हे पत्रक प्रचंड व्हायरल होऊ लागले आहे. या बक्षिसांची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.