सिजान खानच्या पोलिस काेठडीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिजान खानच्या पोलिस काेठडीत वाढ
सिजान खानच्या पोलिस काेठडीत वाढ

सिजान खानच्या पोलिस काेठडीत वाढ

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २८ (बातमीदार) : अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी सिजान खान याच्‍या अडचणीत वाढ झाली आहे. त्‍याला ३० डिसेंबरपर्यंत दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मिळाली आहे. चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आज बुधवारी (ता. २८) वालिव पोलिसांनी सिजान खान याला वसई न्यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्‍याला ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सिजान खान आणि त्याची एक अनोळखी मैत्रीण यांच्यात एक तासाच्यावर वॉट्सॲप चॅटिंग झाली आहे. तुनीषाची आत्महत्या झाल्यानंतर सिजानने ती चॅटिंग डिलीट केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे ती मैत्रीण कोण, सिजान आणि त्या मैत्रिणीत काय चॅटिंग झाले होते, याचा तपास करणे बाकी आहे.

पोलिसांनी न्‍यायालयात सांगितले...
सिजान हा पोलिस तपासाला सहकार्य करत नाही. तसेच आत्महत्येपूर्वी सिजान आणि तुनीषाने एकत्र जेवण केले होते. त्यावेळी काय झाले होते? सिजानने तुनीषा सोबत ब्रेकअप केले तेव्हा तुनीषाची आई आणि सिजान यांच्यात फोनवर काय चर्चा झाली? याचा तपास करायचा असल्‍याचे वालिव पोलिसांनी न्‍यायालयात सांगितले. याच मुद्द्यावर सिजानला दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी पाच दिवसांची कोठडी मागितली होती. त्यावर न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. ज्याप्रमाणे तुनीषाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे; तीच परिस्थिती सिजानच्या कुटुंबाची आहे. या केसचा पूर्ण तपास व्यवस्थित व्हावा यासाठी आम्ही कोणताही विरोध केला नाही.
- शरद रॉय, सिजान खानचे वकील

पूर्ण तपास व्हावा, ही आमची मागणी आहे. आम्हाला जेव्हा बॉडी मिळाली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. त्याच्या अर्धा तास अगोदर तुनीषाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिचा मृत्यू कसा झाला, त्याचे फोटो, व्हिडीओ काहीच नाहीत. त्यामुळे याचा सर्व तपास झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
- पवन शर्मा, तुनीषाचा मामा