रुग्णालयातील ‘मावशी’ मालामाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालयातील ‘मावशी’ मालामाल
रुग्णालयातील ‘मावशी’ मालामाल

रुग्णालयातील ‘मावशी’ मालामाल

sakal_logo
By

सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ ः प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या नातेवाईकांकडे सफाई कर्मचाऱ्यांकडून (मावशी) थेट पैसे मागण्याचा प्रकार नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ रुग्णालयात घडला आहे. विशेष म्हणजे, प्रसूती झाल्यानंतर राजीखुशीने दिली जाणारी रक्कम थेट दोन हजारांच्या घरात गेली असून एखाद्या वेळेस कोणी पैसे दिले नाही तर संबंधित रुग्णांची हेळसांड करण्याचे प्रकार होत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
खासगी रुग्णालयात गोर-गरीब जनतेची प्रसूतीदरम्यान सिझेरीयनच्या नावाखाली होणारी लूट पाहता सर्वसामान्यांसाठी महापालिकेची रुग्णालये आधार ठरली आहेत. नवी मुंबई महापालिकेतर्फे नेरूळ, वाशी आणि ऐरोली या तीन रुग्णालयांमध्ये महिलांच्या प्रसूतीची सुविधा आहे. आता बेलापूर येथील सामान्य रुग्णालयातही महापालिकेने महिलांसाठी ही सुविधा सुरू केली आहे. या रुग्णालयांमध्ये मोफत आणि अत्यंत काळजीपूर्वक प्रसूती केली जात असल्याने परिसरातील महिलांकडूनही प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, नेरूळ, वाशी यांसारख्या रुग्णालयांमध्ये दिवसाला ३० पेक्षाही जास्त महिलांची प्रसूती होत आहे. मात्र, महिलांच्या वाढणाऱ्या संख्येचा गैरफायदा घेत प्रसूती कक्षातील महिला सफाई कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाइकांकडे थेट दोन हजार रुपयांची मागणी केली जात आहे. तसेच जे कोणी पैसे देणार नाहीत. त्यांच्या रुग्णांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकारच महिला सफाई कर्मचाऱ्यांकडून केला जात असल्याने महिलांची हेळसांड होत आहे.
--------------------------
थेट आत्मदहनाचा इशारा
प्रसूतीनंतर मागितलेले पैसे दिले नसल्यामुळे नेरूळ येथे संबंधित मावशीने महिलेची लघवीची बॅग बदलून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महिलेच्या नातेवाइकांना तिची बॅग बदलावी लागली. तसेच पैसे दिले नाही तर खाटा देण्यासही नकार दिला जात आहे. हा प्रकार नेरूळ येथील रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आला आहे. तसेच या प्रकरणी महापालिकेने संबंधित महिला सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर रुग्णालयात आत्मदहन करण्याची धमकी दिल्याने या महिलांवर अद्याप प्रशासनाने कारवाई केलेली नाही.
----------------------------------------
महिनाकाठी दीड लाखांचे उत्पन्न
नेरूळ येथील रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे प्रसूती झालेल्या महिलेच्या नातेवाइकांकडे किमान दोन हजार रुपये मागितले असल्याची बाब समोर आली आहे. अशातच एका रुग्णालयात दिवसाला किमान २० प्रसूती होतात. या महिलांची सिझेरीयन झाली असल्याने बहुतांश महिला पालिकेच्या लेबर कक्षात देखभालीसाठी थांबतात. अशा प्रत्येकाकडून दिवसाला जरी सरासरी दोन हजार रुपये गोळा केल्यास एका रुग्णालयात चार ते पाच कर्मचाऱ्यांच्या भागीदारीनुसार महिनाकाठी सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे स्पष्ट आहे.
-----------------------------------------
रोख नसेल तरी यूपीआय चालेल
महिलेची प्रसूती झाल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयातील महिला सफाई कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते. विशेष म्हणजे, अचानक एवढे पैसे मागितल्यानंतर थेट यूपीआयने देखील पैसे स्वीकारण्याची हिंमत कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच मुलगा असेल तर दोन हजार आणि मुलगी असेल तर दीड हजार रुपये मानधन ठरवण्यात आले आहे.
-----------------------------------------
प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या नातेवाइकांकडे पैसे मागण्याची तक्रार पालिकेला प्राप्त झाली आहे. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच कठोर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यास कंत्राटदाराला सांगितले आहे.
-डॉ. प्रमोद पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका