भिवंडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bogus Doctor
भिवंडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट,

Bogus Doctor : भिवंडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

- पंढरीनाथ कुंभार

भिवंडी - भिवंडी शहर आणि परिसरात मोठ्या संख्येने बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून, त्‍यामुळे या भागातील रुग्‍णांचा जीव धोक्‍यात आला आहे. महापालिकेला कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने पालिकेच्या पथकाची कारवाई पूर्णत: थंडावली आहे. ही कारवाई थांबल्याने बोगस डॉक्टरांचे फावले असून, नागरिक आणि रुग्णांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर कामगार वस्ती असून ते झोपडपट्टी भागात राहतात. परप्रांतातून रोजगारासाठी आलेल्‍या कामगारांना वारंवार आरोग्याच्‍या समस्या उदभवतात. उपचारासाठी सरकारी दवाखान्यात न जाता जवळच असलेल्या डॉक्टरकडे जातात. बहुतांश कामगार अशिक्षित असल्याने ते डॉक्टरांची पदवी न पाहता उपचार घेतो. कामगारांची गरज आणि हतबलतेचा फायदा घेत बोगस डॉक्टरांचा शहरात सुळसुळाट झाला आहे. अगदीच गंभीर आजार उदभवला तर याच डॉक्टरांच्या शिफारशींवर मोठ्या तज्ज्ञ डॉक्टर अथवा हॉस्पिटलमध्ये जातात.

भिवंडीत नदीनाका-म्हाडाकोलोनी, बारक्या कंपाऊंड, खंडू कंपाऊंड, रामनगर, गायत्रीनगर, शांतीनगर, आझादनगर, नवीवस्ती, सोनाळे, हनुमान टेकडी, फुलेनगर, पद्मानगर, कामतघर, अजमेर नगर, अंजूरफाटा, नारपोली, भंडारी कम्पाऊंड, आझमीनगर, दर्गा रोड, इदगा रोड, अंबिकानगर, कोंबडपाडा, रामेश्वर तलाव, कणेरी आदी भागातील झोपडपट्टीमध्ये मोठ्या संख्येने कामगार वर्ग राहत आहे. त्याच ठिकाणी सुमारे २०० पेक्षा जास्त बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. हे डॉक्टर झोपडीत अथवा कच्च्या घरात भाड्याच्या जागेत आपला दवाखाना फलक लावून सुरू करतात. समाजावर प्रभाव पाडण्यासाठी काही बोगस डॉक्टर पक्क्या बांधकाम केलेल्या गाळ्यात फर्निचर बनवून आपला दवाखाना थाटतात. या डॉक्टरांचे दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेले असतात. त्यावरून त्यांच्या पदवीचा अंदाज येतो. पण त्यांच्यावर पोलिस कारवाई करीत नाहीत; परिसरातील समाज सेवक आणि लोकप्रतिनिधींना धरून राहिल्याने हे डॉक्टर बिनदिक्कतपणे आपला व्यवसाय करीत असतात.

गोलमाल...

बोगस डॉक्टरांकडे असलेले प्रमाणपत्र हे अनेकदा महाराष्ट्राबाहेरील वैद्यकीय विद्यापीठांचे असते. अनेकदा अशी प्रमाणपत्रे सही शिक्‍क्‍यानिशी विकत घेतलेली असतात. ही प्रमाणपत्रे भिंतीवर लावल्याने गोरगरिबांची फसवणूक होते.

लहान मुलांपासून मोठ्या लोकांना इंजेक्शन देणे, ग्लुकोज लावणे, भूल देऊन टाके घालणे आदी प्रकार या झोपडपट्टीच्या बोगस डॉक्टरांकडून केले जातात. मात्र, कोणाकडेही वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी लागणारे महाराष्ट्राच्या मेडिकल कौन्‍सिलचे प्रमाणपत्र नसते. उपचारामुळे कोणी दगावला तर पोलिसांना आणि पालिकेच्या आरोग्य विभागाला जाग येते.

पालिकेने कारवाई करून बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला तर त्या डॉक्टराचा जामीन होतो. दरम्यान तो डॉक्टर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा उपचार सुरू करतो. यादरम्‍यान कोणी व्यक्ती दगावली तर अशा डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो. पण अशावेळी पोलिस समाजाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल न केल्याने बोगस डॉक्टरांचे फावले आहे.

महानगरपालिका क्षेत्रात कोणताही व्यवसाय करण्यासाठी परवाना दिला जातो. मात्र अशा डॉक्टरांकडे असा परवाना अथवा गुमास्ता लायसन्स नसते. त्यामुळे अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई अथवा न्‍यायालयात मोठी शिक्षा होत नाही. त्यामुळे बोगस डॉक्टर गोरगरीब लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.

भिवंडी महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागात २०१५ पासून आजतागायत केवळ १४ बोगस डॉक्टरांवर कारवाई केल्याची अधिकृत नोंद आहे. शहरातील बोगस डॉक्टरांचा सर्व्‍हे आम्ही केला असून एकावर कारवाई केली तर इतर पळून जातात. त्यासाठी पोलिस बंदोबस्त आवश्यक आहे. पोलिसांचा बंदोबस्त न मिळाल्याने बोगस डॉक्टरांवर कारवाई होत नाही.

- डॉ. जयवंत धुळे, बोगस डॉक्टरविरोधी पथक

पोलिसात गुन्‍हा दाखल

वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना तन्वीर गुलाम मुस्तफा मोमीन (५२) या व्‍यक्‍तीच्या विविध चाचण्या करून त्याच्यावर वैद्यकीय उपचार केल्याने नुकताच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत बोगस डॉक्टर दाम्पत्य मोमीन मुशर्रफ नूर मोहम्मद अशरफी व त्याची पत्नी रायला मुशर्रफ यांच्याविरोधात भोईवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.