एसआरए इमारतीमधील रहिवाशांच्या अडचणीत भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसआरए इमारतीमधील रहिवाशांच्या अडचणीत भर
एसआरए इमारतीमधील रहिवाशांच्या अडचणीत भर

एसआरए इमारतीमधील रहिवाशांच्या अडचणीत भर

sakal_logo
By

मालाड, ता. २९ (बातमीदार) ः जोगेश्वरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत बांधलेल्या इमारतीतील रहिवाशांच्या अडचणीत भर पडली आहे. भूव्यवस्थापक म्हाडाने उपजिल्हाधिकाऱ्यांना अविश्वसनीय पुरावे सादर करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी पत्र पाठवले आहे.
जोगेश्वरी पश्चिमेतील गुलशन नगर येथे विकसक सहयोग होम्सच्या वतीने येथे एसआरए इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत १८९ सदनिका असून जवळपास दीड ते दोन हजार लोक राहत आहेत; मात्र या इमारतीला मागील काही महिन्यांपासून सातत्याने सरकारी विभागाकडून नोटीस बजावण्यात येत असल्‍याने रहिवाशांमध्‍ये चिंता पसरली आहे.
इमारत निरीक्षणादरम्‍यान अग्निशमन दलाला काही त्रुटी आढळल्या. त्यात या इमारतीत असलेले अग्निशमन साहित्य उपयोगाचे नाही, असा ठपका ठेवला आहे. तसेच येथील फायर एक्स्टिंग्युशर असूनही त्याचा उपयोग करता येत नाही. तसेच आग लागली किंवा अत्यावश्यक वेळेत फायर एक्झिस्टच्या जिन्यावर आणि लॉबीवर भंगार साठवून ठेवले असल्‍याचे नमूद केले आहे. तसेच रेफ्युजी फ्लोअर आणि टेरेसही बंद ठेवले असल्‍याचे अग्निशमन दलाच्या पथकाने निरीक्षणात नोंद केल्याचे नोटीसमध्‍ये नमूद केले आहे.

कारवाईचा इशारा
दर सहा महिन्यांनी अधिकृत फायर एजेन्सीकडून अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित आणि आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी असल्याचा दाखला अग्निशमन दलाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जर वेळेत याची पूर्तता केली नाही, तर पालिकेला पाणी आणि वीज कंपनीला वीज खंडित करण्याचे आदेश दिले जाणार, असे नोटीसमध्‍ये म्हटले आहे.
म्हाडा भूव्यवस्थापकांच्या वतीने उपजिल्हाधिकारी अतिक्रमण निष्कासन अंधेरी यांना दिनांक १५ डिसेंबरला पत्र लिहून सहयोग होम्स द्वारा निर्मित या एसआरए इमारतीत अविश्‍वसनीय पुरावे सादर करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच एका स्थानिक रहिवाशाने सहयोग होम्सच्या प्रकल्पाच्या सखोल चौकशीची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.

आमच्या या इमारतीला अग्निशमन दल पालिका तसेच उप-जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटिसा मिळत आहेत. पुढे आमच्यावर कारवाई झाली तर आम्ही काय करावे, कोणाकडे दाद मागावी, हा मोठा प्रश्‍न आहे.
- इमारतीमधील रहिवासी