उल्हासनगरात स्कायवॉकची दुरवस्‍था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात स्कायवॉकची दुरवस्‍था
उल्हासनगरात स्कायवॉकची दुरवस्‍था

उल्हासनगरात स्कायवॉकची दुरवस्‍था

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २९ : सुमारे १३ वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिमेला बांधण्यात आलेल्या शहरातील स्कायवॉकच्या देखभालीसाठी एमएमआरडीए आणि महापालिकेने हात झटकले आहेत. त्यामुळे ३४ कोटींच्या निधीतून बांधण्यात आलेल्या या स्कायवॉकला कुणी वालीच नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत स्कायवॉकचे प्रकरण लावून धरणाऱ्या ‘एक हात मदतीचा’ या संस्थेने न्याय मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली आहे.
२००९ मध्‍ये एमएमआरडीएने ३४ कोटींच्या निधीतून स्कायवॉकची बांधणी केली होती. सुरुवातीला कुतूहलाचा, कौतुकाचा विषय बनलेल्या या स्कायवॉकवर पुढे गुन्हेगारी प्रवृत्तींनी वावर सुरू केला. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, लुटालूट, छळ, अश्लील चाळ्यांच्‍या घटनांसह पोलिसावर हल्ला अशा घटना सातत्याने घडत गेल्या. २०१७ मध्ये या घटनांना आळा घालण्यासाठी ‘एक हात मदतीचा’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कदम यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त अंकित गोयल यांना निवेदन देऊन स्कायवॉकवर पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. सहा महिने बंदोबस्त राहिल्यावर गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण राहिले होते; मात्र गोयल यांची बदली झाल्यावर पोलिसांचा बंदोबस्त काढून घेण्यात आला. त्‍यानंतर गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले. स्कायवॉकवर नशाबाजांचे बस्तान वाढल्याने नागरिकांचा वावर कमी झाला असून, रात्री यावरून जाणे धोकादायक ठरू लागले आहे.

स्कायवॉकची दुरवस्था
एकीकडे समाजकंटकांचे बस्‍तान, अश्लील चाळे हे नित्याचे झाले असतानाच स्कायवॉकची कमालीची दुरवस्था झाली आहे. काही वर्षांपूर्वी स्कायवॉकवरील जळालेले पत्रे अद्यापही बदलण्यात आले नसून पत्रे, फरशा तुटल्या आहेत. काही पत्रे लोंबकळत असून ते पडण्याची शक्यता आहे. ‘एक हात मदतीचा’चा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कदम यांनी त्यांच्या टीमसोबत असुरक्षित बनलेल्या स्कायवॉकची पाहणी करून त्याची फोटोसह माहिती एमएमआरडीएला पाठवून स्कायवॉकच्‍या दुरुस्ती करण्याची मागणी केली.
------------------------------------------------
एमएमआरडीए, पालिकेची टोलवाटोलवी
एमएमआरडीएने विजय कदम यांना लेखी उत्तर पाठवले असून, स्कायवॉक हा २०१७ मध्ये उल्हासनगर महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे. विजय कदम यांनी पालिकेकडे निवेदन दिले असता २१ डिसेंबर रोजी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर यांनी स्कायवॉक हा महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेला नसल्‍याचे लेखी कळवले आहे.
------------------------------------------------------
ताबा नक्की कुणाकडे?
२००९ मध्‍ये ३४ कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या आणि सध्या दुरवस्थेत पडलेल्या स्कायवॉकचा ताबा नक्की आहे तरी कुणाकडे, स्कायवॉकला कुणी वाली आहे की नाही, सर्वसामान्य लोकांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा याला जबाबदार कोण, असे प्रश्न उपस्थित करणारे विजय कदम यांनी स्कायवॉकविषयी कुणीही जबाबदारी निश्चित करत नसल्यामुळे न्याय मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाला निवेदन देण्यात आल्याचे सांगितले.