भिवंडी मध्यवर्ती भागातील स्वच्छतागृह बंदावस्थेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी मध्यवर्ती भागातील स्वच्छतागृह बंदावस्थेत
भिवंडी मध्यवर्ती भागातील स्वच्छतागृह बंदावस्थेत

भिवंडी मध्यवर्ती भागातील स्वच्छतागृह बंदावस्थेत

sakal_logo
By

भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : भिवंडी शहरातील मुख्य बाजारपेठेमधील व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांच्या सोयीसाठी ४५ वर्षांपूर्वी रहदारीच्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्यात आहे होते. हे स्वच्छतागृह पालिकेच्या स्वच्छता व बांधकाम विभागाने अचानकपणे बंद केल्याने सर्वांची गैरसोय झाली असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

तत्कालिन भिवंडी निजामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी परशराम धोंडू टावरे हे १९७५-७६ साली निवडून आल्यानंतर त्यांनी शहरातील रहिवाशांना नियमित पाणीपुरवठा, शिक्षण, दवाखाना, स्वच्छतागृहे सुरू केली. शहरात परप्रांतातून आलेला कामगारवर्ग आणि शहरातील कामासाठी घराबाहेर निघालेले नागरिक कोठेही आडबाजूला नैसर्गिक विधी उरकीत होते. त्यांना शिस्त लागण्याच्या हेतूने आणि शहरात स्वच्छता राहावी या करीता त्यांनी शहरात प्रथम मुताऱ्या आणि सार्वजनिक शौचालये बांधण्यास प्राधान्य दिले. त्यांनी ४५ वर्षांपूर्वी शहराच्या मुख्य मार्गावर आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी स्वच्छतागृह बांधले.

........................
महिलावर्गातून तक्रार
पालिकेच्या दुर्लक्षाने घाणीचे साम्राज्य पसरून शहरातील बऱ्याच मुताऱ्या आणि शौचालये बंद झाली आहेत. परिणामी त्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले. भिवंडी शहरातील मध्यवर्ती भागात बाजारपेठ असून याच भागात बिजीपी दवाखाना, तत्कालीन नगरपालिकेचे कार्यालय, कापड मार्केट, टॅक्सी स्टॅन्ड आणि टांगा स्टॅण्ड होता. रहदारीच्या ठिकाणी नागरिकांसाठी बिजीपी दवाखान्याशेजारी स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. ४५ वर्षांपासून हे स्वच्छतागृह सुरू होते; मात्र पालिकेने हे स्वच्छतागृह अचानक बंद केले. त्यामुळे दररोज या ठिकाणी येणाऱ्या हजारो नागरिकांची गैरसोय झाली आहे. या भागात जवळ मुतारी नसल्याने येथे आलेले नागरिक आणि मधुमेही रुग्ण परिसरात कोठेही नैसर्गिक विधी उरकत आहे. या बाबत महिलावर्ग तक्रार करीत आहेत.

--------------------------
शहरातील स्वच्छतागृहाचे नव्याने बांधकाम करावे लागणार आहे. त्याची सांडपाणी ड्रेनेजला जोडणी करावयाची आहे त्यासाठी हे स्‍वच्छतागृह बंद ठेवण्यात आली आहे. लोकाग्रहास्तव लवकरच सुरू करण्यात येईल.
जयवंत सोनावणे, स्वच्छता विभाग अधिकारी, भिवंडी पालिका