चिमुकल्यांनी घेतला बैलगाडी स्वारीचा अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुकल्यांनी घेतला बैलगाडी स्वारीचा अनुभव
चिमुकल्यांनी घेतला बैलगाडी स्वारीचा अनुभव

चिमुकल्यांनी घेतला बैलगाडी स्वारीचा अनुभव

sakal_logo
By

मालाड, ता. २९ (बातमीदार) ः मुंबईतील चिमुकल्‍यांनी कोकणात जाऊन बैलगाडी सफारी अनुभवली. सेवा दल सात रस्ता मुंबई केंद्रातर्फे २४ आणि २५ डिसेंबरला साने गुरुजी स्मारक आणि परिसरात सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीदरम्‍यान मुलांनी विविध माहितीसह आनंदही लुटला.
सहलीच्‍या पहिल्या दिवशी गांधारपाली येथील बौद्धकालीन लेणी तसेच महाड येथील चवदार तळे आणि मनुस्मृती दहन स्मृतिस्तंभ या ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर मुलांनी स्मारकात बैलगाडीची सफर अनुभवली. संध्याकाळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि शिक्षक नूरखां पठाण यांनी जादूटोणा, बुवाबाजी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा विषय प्रात्यक्षिकातून रंजकतेने उलगडत नेला. या विषयासंदर्भतील मुलांच्या अनेक शंका संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून दूर करण्यात आल्या. रात्री मुलांनी कॅम्प फायरचा आनंद घेतला.
दूसऱ्या दिवशी सकाळी कडाक्याच्या थंडीत सर्वांनी स्मारकातील टेकडीवर धुक्‍यामध्‍ये ट्रेकिंगचा अनुभव घेतला. तेथे स्मारकाचे व्यवस्थापक राकेश याने स्मारकाची माहिती मुलांना दिली. त्यानंतर स्मारकातील साने गुरुजींच्या जीवन प्रदर्शनाला भेट देऊन स्मारकाची सर्वांनी रजा घेतली. पुढे काशीद बीचवर मुलांनी समुद्राची मजा लुटली. त्यानंतर बिर्ला मंदिर येथे भेट देऊन परतीच्या प्रवासाला निघाले. सहलीचे नियोजन आणि व्यवस्थापन सेवा दल सात रस्त्याचे महादेव पाटील, सचिन पाटील, सागर न्यारे, किरण मोहिते यांनी केले होते.

अनेक गोष्‍टी समजल्‍या
सहलीमध्‍ये अनेक गोष्‍टी जवळून पाहता आल्‍या, अशी प्रतिक्रिया चिमुकल्‍यांनी दिली आहे. अंधश्रद्धा व विज्ञान यांचे नाते समजले, तसेच साने गुरुजींबद्दलही माहिती मिळाल्‍याचे मुलांनी सांगितले आहे.