अत्यल्प मानधनामुळे लाभार्थींचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अत्यल्प मानधनामुळे लाभार्थींचे हाल
अत्यल्प मानधनामुळे लाभार्थींचे हाल

अत्यल्प मानधनामुळे लाभार्थींचे हाल

sakal_logo
By

जव्हार, ता. २९ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील दिव्यांग व वृद्ध निराधारांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना इत्यादी योजनांतर्गत दरमहा १ हजार रुपये मानधन दिले जाते. जव्हार तालुक्यातील विविध योजनांमधून १९ हजार २२७ नागरिकांना शासनाचे मानधन हे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मदतीने १ हजार रुपये देण्यात येत आहे; मात्र महागाई दिवसेंदिवस वाढत असताना देण्यात येणारे हे मानधन तोकडे पडत असल्याने या मानधनात वाढ करण्याची मागणी जव्हार तालुक्यातील दिव्यांग, वृद्ध नागरिकांनी केली आहे.
शासनाने प्रत्येक वस्तूंवर जीएसटी लागू केल्याने आज प्रत्येक साध्या साध्या वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्वसाधारण मनुष्याचे जगणेसुद्धा कठीण झाले आहे. मग निराधारांनी जगावे तरी कसे? असा प्रश्न लाभार्थींना पडला आहे. आरोग्य व उदरनिर्वाहासाठी केवळ १ हजार रुपये अर्थसाह्य परवडेनासे झाले आहे. त्यामुळे या मानधनात शासनाने तातडीने वाढ करून किमान ६ हजार रुपये प्रतिमहा अर्थसाह्य द्यावे, अशी दिव्यांग व वृद्ध निराधार व्यक्तींची मागणी आहे.

----------------------------
जव्हार तालुक्यातील विविध योजनांतील लाभार्थी
संजय गांधी निराधार अनुदान योजना : २९५३
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना : ९८०२
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना : ५९५३
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना : ५०२
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना : १७
राष्ट्रीय कुटुंबलाभ अर्थसाह्य योजना : ४२
एकूण : १९२२७

----------------------
मला शासनाच्या या योजनेच्या मानधनाशिवाय दुसरा कोणताही आधार नाही. त्यामुळे महिन्याला १ हजार रुपयांत जीवन जगणे कठीण झाले आहे. औषधांचा खर्चसुद्धा एक हजार रुपयांमध्ये भागवणे कठीण झाले आहे. यासाठी आता तरी शासनाने आमच्या मानधनात वाढ करावी.
- लक्ष्मी काटेला, वृद्ध महिला

------------------------
संजय गांधी योजना ही राज्य शासनाची असून राज्य शासनाकडून लाभार्थ्याला ८०० रुपये व केंद्र सरकारच्या माध्यमातून २०० रुपये दिले जात आहेत. इंदिरा गांधी योजना ही केंद्र सरकारची आहे. या योजनांच्या अनुदानवाढीबाबत अद्याप कोणतीही सूचना आलेली नाही.
- सुदेश शिंदे, नायब तहसीलदार, जव्हार