जलजोडणीसाठी ३१ गावांची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलजोडणीसाठी ३१ गावांची प्रतीक्षा
जलजोडणीसाठी ३१ गावांची प्रतीक्षा

जलजोडणीसाठी ३१ गावांची प्रतीक्षा

sakal_logo
By

नाविद शेख : सकाळ वृत्तसेवा
मनोर, ता. २९ : पालघर जिल्ह्यातील महामार्गालगतच्या ४५ गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनांना एमएमआरडीएच्या जलवाहिनीमधून जलजोडणी दिली जाणार आहे. थेट पाणीपुरवठा होणार असल्याने पाणी शुद्धीकरण आणि वीज बिलाच्या रकमेत बचत होऊन पाणीपुरवठा योजना अधिक सक्षमपणे कार्यरत राहणार आहेत; तर दुसरीकडे एमएमआरडीएची मंजुरी न मिळाल्याने ३१ गावे नळजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्हा परिषदेच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत महामार्गालगतच्या ४८ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ७६ गावांच्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. या गावांमध्ये पुरेशा प्रमाणात जलस्रोत उपलब्ध नसल्याने एमएमआरडीएच्या जलवाहिनींमधून जलजोडणी देण्याची मागणी जिल्हा परिषदेने एमएमआरडीएकडे केली होती. केंद्र सरकारचा जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने या गावात पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने एमएमआरडीएकडे जलजोडणी देण्याची मागणी करण्यात आली होती.
एमएमआरडीए राबवत असलेल्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी डहाणू, पालघर आणि वसई तालुक्याच्या पूर्वेकडील ग्रामीण भाग आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रातून जात आहे. ही जलवाहिनी या ७६ गावांच्या हद्दीतून जाते. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी शाश्वत स्रोत उपलब्ध नसल्याने या जलवाहिनीतून नळजोडणी देण्यात यावी, असे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. या ७६ गावांची दररोजची पाण्याची मागणी २२.३३ दशलक्ष लिटर असल्याचे सांगत सुमारे २५ दशलक्ष लिटर पाणीसाठ्यासह जल जोडणी देण्याची मागणी जिल्हा परिषदेने एमएमआरडीएकडे केली होती.
जिल्हा परिषदेच्या प्रस्तावानुसार एमएमआरडीएने ७६ पैकी ४५ गावांना जोडणी देण्यास मान्यता दिली आहे; तर अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाल्यास उर्वरित ३१ गावांसाठी जलजोडणी देण्यात येईल, असे स्पष्टीकरण एमएमआरडीएने दिले आहेत. त्यामुळे जलजोडणी न मिळाल्यास या गावांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

...
एमएमआरडीएच्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पालघर जिल्ह्यातील गावांसाठी १५ दशलक्ष लिटर पाणीसाठा मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ७६ गावांसाठी २५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता, पण एमएमआरडीएकडून १५ दशलक्ष लिटर पाणी साठ्याअंतर्गत ४५ गावांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी स्थानिक स्तरावर पाण्याचे स्रोत वापरले जाणार आहेत.
- भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर
..
सध्या १५ दशलक्ष लिटर पाणी साठ्याअंतर्गत ४५ गावांना जलजोडणीसाठी मंजुरी दिली आहे. अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाल्यास उर्वरित गावांसाठी जलजोडणी देण्यात येईल.
- हनुमंत सोनावणे, कार्यकारी अभियंता, एमएमआरडीए

....
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत एमएमआरडीएने दिलेल्या आश्वासनानुसार महामार्गालगतच्या गावांना जलजोडणी दिली पाहिजे. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळणार नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
- अविनाश पाटील, सदस्य, आदिवासी पुनर्वसन आंदोलन
..
पाणीसाठा राखीव ठेवण्याचे निर्देश
एमएमआरडीएच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध करून सुरू केलेल्या आंदोलनामुळे पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले होते. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक केल्याच्या निषेधार्थ मनोर पोलिस ठाण्यावर संघर्ष समितीने निषेध मोर्चा काढला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी एमएमआरडीए, शेतकरी आणि सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीसोबत बैठक आयोजित करून बाधित गावांसाठी पाण्याचा साठा राखून ठेवण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले होते. त्यानुसार एमएमआरडीएकडून १५ एमएलडी पाणीसाठा राखून ठेवल्याचे जाहीर केले होते.