
नोकरीच्या आमिषातून ४५ लाखांना गंडा
नवी मुंबई, ता.२९ (वार्ताहर) : जॉब पोर्टलचे प्रतिनिधी असल्याचे भासवून एकाला परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ४५ लाख ४९ हजारांची रक्कम उकळली आहे. या प्रकरणी नेरूळ पोलिसांत फसवणूक तसेच आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे.
नेरूळ सेक्टर-३ येथे राहणारे हेमंतकुमार नोकरीच्या शोधात आहेत. त्यासाठी त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये एका जॉब पोर्टलवर माहिती टाकली होती. त्यानंतर काही दिवसांमध्येच दीपक कोटीयाल नावाच्या व्यक्तीने वर्क व्हिजनमधून बोलत असल्याचे सांगून हेमंतकुमार यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच ओमान येथील ब्रिटिश पेट्रोलियममध्ये नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत काही लाखांची रक्कम उकळली होती. त्यानंतर काही दिवसांनी शिवी रावत, कुणाल अवस्थी व आदित्य बक्षी यांनीदेखील इनडीड कंपनीतून बोलत असल्याचे भासवून हेमंतकुमार यांना कॅनडात नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले होते. तसेच त्यांना व्हिसा प्रोसेसिंग फी, मेडिकल फी, विमा अशी वेगवेगळी कारणे सांगून लाखो रुपये उकळले होते.