कचऱ्यातून मत्स्यखाद्याची निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचऱ्यातून मत्स्यखाद्याची निर्मिती
कचऱ्यातून मत्स्यखाद्याची निर्मिती

कचऱ्यातून मत्स्यखाद्याची निर्मिती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.२९ ः मासळी मार्केटमधील कचरा ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई महापालिकेने शहराच्या स्वच्छतेबरोबरच मासळी मार्केटमधील कचऱ्यावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून मत्स्य खाद्य तयार करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने दिवाळेगाव मार्केट येथे पालिकेकडून ‘फिश फीड’ हा एक अभिनव उपक्रम प्रायोगिक स्वरूपात राबवला जात आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या पुढाकारातून कार्यान्वित प्रकल्प ‘फिश फीड’ हा प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबवला जाणारा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. यामुळे नवी मुंबई महापालिका आणखी एका नावीन्यपूर्ण उपक्रमाचा आरंभ करण्यामध्ये देशात अग्रणी ठरली आहे. फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया या भारत सरकार मान्यताप्राप्त संस्थेचा वतीने एक टन क्षमतेचा हा फिश फीड प्रकल्प दिवाळेगाव मासळी मार्केटमध्ये प्रायोगिक स्वरूपात कार्यान्वित करण्यात आला आहे. याबाबतचा सामंजस्य करार महापालिका आणि संस्थेमध्ये झाला आहे. त्यानुसार २०० किलो मासळीच्या कचऱ्याची एक बॅच अशा दिवसभरात पाच बॅचेसची या प्रकल्पातून निर्मिती केली जाणार आहे.
------------------------
महिला सक्षमीकरणावर भर
या प्रकल्पासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यापासून ते हा प्रकल्प कार्यान्वित राखण्याची संपूर्ण जबाबदारी फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेने उचलली असून नवी मुंबई महापालिकेसोबत तशा प्रकारचा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. तसेच या कार्यवाहीकरिता मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्या महिलांचे विशेष सहकार्य लाभणार असून तेथील महिला बचत गटांमधील दोन महिलांना याठिकाणी रोजगारही उपलब्ध होणार आहे.
-------------------------------------
टप्प्याटप्प्याने इतर मार्केटमध्ये
केंद्र सरकार अंगीकृत भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्यामार्फत पुरविण्यात आलेल्या तंत्रज्ञानानुसार फिश फीड हा प्रकल्प फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत दिवाळे गावातील मासळी मार्केटमध्ये प्रायोगिक स्वरूपात राबवण्यास सुरुवात केली आहे. तसेच या प्रकल्पानंतर टप्प्याटप्प्याने इतरही मासळी मार्केटमध्ये ही कार्यप्रणाली राबवण्याचे नियोजन आहे.